संसार उद्ध्वस्त करणारा पाऊस ; गाढ झोपेत असलेल्यांवर काळाने घाला घातला, त्यावेळी एकच हलकल्लोळ झाला

मुसळधार पाऊस सुरु असतानाच आपल्या शेजाऱ्यांवर संकट कोसळल्याचे लक्षात येताच परिसरातील रहिवाशांनी एकच गर्दी केली. बचाव कार्याचा कुठलाच अनुभव नसतानाही मिळेत त्या साधानाने मलबा उपसण्यास सुरुवात केली. मलब्याखाली दबलेली कुटुंब जीवंत असतील, या आशेने सगळ्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. पण या रहिवाशांच्या हाती प्रेतंच लागत होती.

  मुंबई : भिंत खचली चूल विझली होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले अशी गत आस्मानी संकटातून वाचलेल्या चेंबूरमधील भारत नगरातील नागरिकांची झाली आहे. शनिवारी रात्री मुसळधार पावसाने तब्बल दोन डझन  निष्पाप जीव घेतले. संसार उद्ध्वस्त झाले. अजिबात चाहूल लागू न देता गाढ झोपेत असलेल्यांवर काळाने घाला घातला.  निमित्त झालं ते मुसळधार पावसामुळे डोंगरातून वेगाने आलेल्या दरडीचं. या दरडीनं अक्षरश: चिखल केला, संसारांचा, खुराड्यांसारख्या घरात जपलेल्या स्वप्नांचा.

  आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळत होता. उत्तररात्री पावसाने अधिकच जोर धरला. श्रमिकांची वसाहत असलेला भारत नगरचा भाग शांत झोपेत होता. डोंगरावरुन घरंगळत येणाऱ्या संकटाची कोणालाच कल्पनादेखिल नव्हती. आणि काही वेळात होत्याचे नव्हते झाले. सहा ते सात घरांवर दरडीपासून संरक्षण करणारी भिंत कोसळली. वेगाने आलेल्या पाण्यासह दगड माती वाहून आली आणि घात झाला.

  प्रत्यक्षदशीर्ंच्या  माहितीनुसार त्यावेळी एकच हलकल्लोळ झाला. मुसळधार पाऊस सुरु असतानाच आपल्या शेजाऱ्यांवर संकट कोसळल्याचे लक्षात येताच परिसरातील रहिवाशांनी एकच गर्दी केली. बचाव कार्याचा कुठलाच अनुभव नसतानाही मिळेत त्या साधानाने मलबा उपसण्यास सुरुवात केली. मलब्याखाली दबलेली कुटुंब जीवंत असतील, या आशेने सगळ्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. पण या रहिवाशांच्या हाती प्रेतंच लागत होती.

  स्थानिकांचे मदतकार्य सुरु असतानाच पोलिसांना, महापालिकेला, एनडीआरएफला सूचना देण्यात आली. यंत्रणेपर्यंत माहिती पोहचून प्रत्यक्ष घटनास्थळी पोहचण्यासाठी यंत्रणेला पहाटेचे साडेचार, पाच वाजले. एनडीआरएफने बचावकार्य हाती घेतले. रहिवासी आणि एनडीआरएफच्या जवानांनी पाच जणांना सुख्ररुप बाहेर काढलं. तर तब्बल १६ मृतदेह एकापाठोपाठ एक बाहेर काढण्यात येत होते.

  वरुन कोसळणारा पाऊस आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रुंचा पूर अशा वातावरणात दगड मातीचा चिखल तुडवत बचावकार्य सुरु होते. ढिगाऱ्याखाली कोणीतरी जिवंत असेल, या आशेने जवान कार्यरत होते. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. पारधे, झिमूर, गोरसे यांची  कुटुंबच काळाच्या कराल दाढेत विसावली. ठाकूर कुटुंबातील उर्मिला आणि त्यांची दोन वर्षांची चिमुरडी खुशी यांचा मृतदेह बाहेर काढताना गर्दीला हुंदका आवरता आला नाही.

  ही घ्ररे धोकादायक आहेत. याठिकाणी राहू नका असे तीन – तीन वेळा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बजावले होते, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी या घटनेनंतर सांगीतले. पण पालिकेची उपाययोजना कमी पडली. इथून नागरिकांना स्थलांतरित होण्याचा महापालिकेने  दिलेला पर्याय कसा कुचकामी होता, याचीही चर्चा या गर्दीत सुरु होती. एका पाठोपाठ एक रुग्णवाहिकांमधून नेले जाणारे मृतदेह, वातावरणातील उदासी, नैराश्य, आणि भिषणता वाढवत होते.

  विक्रोळी परिसरातही मृत्यूचे थैमान 

  चेंबूरमध्ये काळाने डाव साधल्यानंतर विक्रोळी परिसरातही थैमान घातले. याठिकाणी सहा जणांचा बळी गेला. बघ्यांची गर्दी, बचाव कार्यासाठीची धावपळ, मृतकांच्या नातेवाईकांचे हुंदके आणि या सगळ्या दु:खानंतरही सूडाने पेटल्यासारखा कोसळणारा पाऊस प्रत्येक मनात भीती घालत होता.

  मानवनिर्मित संकट?

  दरड कोसळून जीव जाणं, एखादी जुनी इमारत कोसळून कुटुंबांचे उद्ध्वस्त होणे, हे मानवनिर्मित संकट आहे, की नैसर्गिक हा प्रश्न अशा घटनांनंतर ऐरणीवर येतो. आस्मानी संकट म्हणून संबंधित प्रशासन, सत्ताधारी या प्रश्नापासून पिंड सोडवू पाहतात. तर अशी संकटं सुलतानीच आहेत, हे सांगण्याचा  विरोधकांचा प्रयत्न सुरु असतो. पण प्रशासनाचे अपयश एवढंच या समस्येचं उत्तर नाही. शासकीय आवास योजनांच्या गमजा मारल्या जात असताना अत्यंत गैरसोयीत, जीवाची जोखिम पत्कारुन अशा कुटुंबांना का रहावं लागतं? या प्रश्नाचा मूळापासून शोध घेण्याची खरी गरज आहे.