गोव्यात महाविकास आघाडी सारखा प्रयोग करण्याचा विचार : संजय राऊत

गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडी सारखा प्रयोग करण्याचा विचार आहे, त्या संदर्भात हालचाली सुरू आहेत. त्या महाविकास आघाडी मध्ये शिवसेनेला चांगले स्थान मिळाले तर नक्कीच शिवसेना त्याच्या मध्ये सहभागी होऊ शकेल असे खा. राऊत म्हणाले.

    मुंबई : शिवसेना प्रवक्ता आणि खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला त्यात त्यांनी आगामी काळात गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना नक्की लढणार असून उत्तर प्रदेश मध्ये देखील ८९ ते ९० जागा लढविण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती दिली. याबाबत अन्य स्थानिक पक्षांमध्ये चर्चा सुरू आहेत गोव्यामध्ये साधारणतः २० जागा लढविण्याचा विचार असल्याची माहिती राऊत यानी दिली. गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडी सारखा प्रयोग करण्याचा विचार आहे, त्या संदर्भात हालचाली सुरू आहेत. त्या महाविकास आघाडी मध्ये शिवसेनेला चांगले स्थान मिळाले तर नक्कीच शिवसेना त्याच्या मध्ये सहभागी होऊ शकेल असे खा राऊत म्हणाले.

    अफवा पसरवण्याचा आनंद त्यांनी घ्यावा

    यावेळी राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कालच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले की, असा हवेत गोळीबार करून चालत नाही आणि कोणी कोणाच्या थोबाडीत वगैरे मारत नाहीत चंद्रकांत पाटील असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे आणखी कोणी लोक असतील ते अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतात तर त्यानी तो आनंद घ्यावा पण वारंवार हेच सांगतो की हे सरकार पुढील तीन वर्ष देखील उत्तम प्रकारे चालेल आणि त्यानंतर देखील महाविकास आघाडी सत्तेवर येईल.

    गुजरात मध्ये भाजपची स्थिती बरी नाही

    गुजरातच्या मुख्यमंत्री फेरबदलाबाबत राऊत यांनी सावध प्रतिक्रिया देताना एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री बदलणे हा त्या राज्याचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्याच्यावरती इतरांनी भाष्य करण्याची गरज आहे, असे सांगितले. मात्र गुजरात मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती तितकीशी बरी नाही असा राजकीय चिमटा घेण्यास ते विसरले नाहीत.

    गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग

    राऊत म्हणाले की, उत्तरप्रदेश मध्ये काही शेतकरी संघटनांनी तुम्ही निवडणूक लढा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे असे सांगितले आहे. तर इतर काही लहान पक्ष आहेत त्यांनादेखील शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे असे ते म्हणाले. गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडी सारखा प्रयोग करण्याचा विचार आहे त्याला कितपत यश येते त्या संदर्भात निश्चित काही सांगता येणार नाही पण त्या संदर्भात हालचाली सुरू आहेत. त्या महाविकास आघाडी मध्ये शिवसेनेला चांगले स्थान मिळाले तर नक्कीच शिवसेना त्याच्या मध्ये सहभागी होऊ शकेल .

    उद्धव ठाकरेंमध्ये राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता

    उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आपोआप देशाचा नेता होत असतो. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला संपूर्ण देशातून समाधान मिळणे गरजेचे आहे असे ते म्हणाले.