mumbai crime

मुंबईतून अमेरिकन नागरिकांना गंडवणाऱ्या ३ बोगस कॉल सेंटर्सचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई मालाड व बांगुर नगर पोलिसांनी केली. या कारवाईत एकूण १० जणांना अटक(10 people arrested in bogus call centers case)  करण्यात आली आहे.

  मुंबई : मुंबईतून अमेरिकन नागरिकांना गंडवणाऱ्या ३ बोगस कॉल सेंटर्सचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ही कारवाई मालाड व बांगुर नगर पोलिसांनी केली. या कारवाईत एकूण १० जणांना अटक(10 people arrested in bogus call centers case)  करण्यात आली आहे. एकूण ४५ कॉम्प्यूटर, १४ लॅपटॉप, २८ मोबाईल, राऊटर्स व अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहेत, अशी माहिती परिमंडळ ११ चे उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली.

  संचारबंदीत कर्तव्य बजावत असताना मालाड व बांगुर नगर परिसरात बोगस कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती पोलिसांना समजली. सदर माहितीच्या आधारे मालाड व बांगुर नगर पोलिसांनी कारवाईसाठी विशेष पथक नेमले. या पथकांनी सर्वप्रथम मालाड परिसरातल्या रामबाग लेन येथील लाेटस बिजनेस पार्कमध्ये धाड टाकली.

  त्यावेळी वाईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉलद्वारे अमेरिकन नागरिकांशी व्हिआग्रा व अन्य उतेजक औषधांची विक्री सुरू होती. या कारवाईत ताब्यात घेतलेले तिघे जण औषधांच्या नावाखाली ऑनलाईन पैसे घेत होते, मात्र प्रत्यक्षात औषधे देत नव्हते.
  दरम्यान, बांगुर नगर परिसरातील पाम स्प्रिंग येथे पोलिसांनी धाड टाकली.

  गुगल कंपनीचा कर्मचारी नसतानाही खोटी माहिती सांगून अमेरिकन नागरिकांना सॉफ्टवेअर, तत्सम वस्तू ऑनलाईन विकल्या जात होत्या. या कारवाईत पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईदरम्यान या स्प्रिंग इमारतीत आणखी एक बोगस कॉल सेंटर सुरू असल्याचे पोलिसांना समजले.

  त्यानुसार पोलिसांनी तेथेही कारवाई केली. या कॉल सेंटरमध्ये व्हिआग्रा व इतर औषधांची ऑनलाईन विक्री सुरू हाेती. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

  या तिन्ही कारवाया प्रकरणी मालाड व बांगुर नगर व चारकोप पोलिसांनी आरोपी नबीला खान (२७), डेराक फर्नानडेस (३८), सुहास जाधव (३१), शाद खान (२८), मिलन सोनी (३४), विशाल सोनी (३८), हुसेन नौशाद अली शेख (२०), शुभम विश्वकर्मा (२३), प्रज्वल शेट्टी (२२) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

  या आरोपींना न्यायालयात हजर केले असता ३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींनी किती अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली, या तपास संबंधित पोलीस ठाण्याचे पथक करत आहे.

  या गुन्ह्यांची उकल परिमंडळ ११ चे उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक फटांगरे, पोलीस निरीक्षक सुधीर दळवी, पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, पोलीस निरीक्षक ज्योती भोपळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आंधळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पाचगणे, पोलीस उपनिरीक्षक किसवे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, सायबर तज्ज्ञ नरेश इंगाळे, पुष्कर झांट्ये, नितांशू डोईफोडे व पोलीस पथकांनी केली.