Time of starvation on taxi drivers in Mumbai; 75% of drivers are out of business

वाढत्या कोरोनाच्या पार्शभूमीवर गेल्या वर्षी सहा महिने रिक्षा टॅक्सी बंद ठेवण्यास सांगितली होती. लॉकडाऊनमध्ये घर चालवण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी बँकांमधून, सावकराकडून कर्ज काढले होते. परिणामी अनेक टॅक्सी चालकांवर कर्जाचे ओझे झाले आहे. त्यात आता कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, यात टॅक्सी रिक्षा चालकांना व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे लोक बाहेर पडत नाहीत. त्यामुळे शासनाने दिलेल्या परवानगीचा काही फायदा नाही.

    मुंबई : सततच्या लॉकडाऊनमुळे मुंबईतील टॅक्सी चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तब्बल ७५ टक्के टॅक्सीचे मीटर बंद करून चालक गावाकडे गेले आहे. त्यामुळे सरकारने टॅक्सी चालकांना तत्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनचे महासचिव ए. एल. क्वाड्रोस यांनी केली आहे.

    वाढत्या कोरोनाच्या पार्शभूमीवर गेल्या वर्षी सहा महिने रिक्षा टॅक्सी बंद ठेवण्यास सांगितली होती. लॉकडाऊनमध्ये घर चालवण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी बँकांमधून, सावकराकडून कर्ज काढले होते. परिणामी अनेक टॅक्सी चालकांवर कर्जाचे ओझे झाले आहे. त्यात आता कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र, यात टॅक्सी रिक्षा चालकांना व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे लोक बाहेर पडत नाहीत. त्यामुळे शासनाने दिलेल्या परवानगीचा काही फायदा नाही.

    मुंबईतील रेल्वे स्थानके, विमानतळ आणि बाजारपेठांवर टॅक्सी चालकांचा व्यवसाय अवलंबून आहे. मात्र, सरकारने विमानसेवेसह रेल्वे प्रवासावर निर्बंध लादल्याने २५ टक्क्यांहून अधिक चालकांना फटका बसला आहे. याउलट खासगी कार्यालयांत १५ टक्के उपस्थिती आणि बाजारपेठा बंद असल्याने ४० टक्क्यांहून अधिक चालकांनी व्यवसाय गमावला आहे. आधी कडक निर्बंध आणि आता लॉकडाऊन पुकारल्याने ६० टक्क्यांहून अधिक रोजगाराला फटका बसला आहे. परिणामी, चालकांनी टॅक्सी मालकांच्या स्वाधीन करत गावाकडची वाट धरली आहे. परिणामी ७५ टक्के टॅक्सी पार्किंगमध्ये उभ्या असल्याचा दावा मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने केला आहे.

    टॅक्सी चालक नियमितपणे परिवहन विभागाकडे कर भरत आले आहेत. याशिवाय रात्री-अपरात्री मुंबईत प्रवासी वाहतुकीसाठी नागरिकांसमोर टॅक्सीशिवाय दुसरा पर्याय नाही. अशा परिस्थितीत ७५ टक्क्यांहून अधिक चालक गावाकडे गेल्यास नागरिकांची अडचण होऊ शकते. विशेषतः रुग्णांची आणि अत्यावश्यक कामासाठी टॅक्सीअभावी लोकांना गंभीर परिणामांचा सामना करावा लागेल. म्हणूनच सरकारने टॅक्सी चालकांना आर्थिक सहाय्य करण्याची मागणी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने केली आहे. अन्यथा लॉकडाऊन संपल्यानंतर टॅक्सी सेवा कोलमडण्याची भीती संघटनेचे अध्यक्ष ए. एल. क्वाड्रोस यांनी व्यक्त केली आहे.