प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटीमागे सुप्रिया सुळेंचे प्रयत्न, भेटीच्या ‘टायमिंग’मुळे चर्चाना उधाण!

सूत्रांच्या माहितीनुसार खरेतर खा.सुळे यांनी बंगालच्या निवडणुकांनंतर सर्वप्रथम प्रशांत किशोर यांना संपर्क करून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या वर्धापनदिना निमित्त त्यांना मुंबईत निमंत्रित करून कार्यकर्त्याना मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न होता.

  किशोर आपटे

  मुंबई : निवडणुक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रदीर्घ भेटीची संकल्पना खा. सुप्रिया सुळे यांचीच होती, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मागील गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बावीसावा वर्धापनदिन साजरा झाला. त्याच्या आदल्या दिवशी नवी दिल्लीत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात झालेल्या बंद व्दार भेटीच्या चर्चाना उधाण आले होते. या सा-या वातावरणाला शुक्रवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी लंचकरीता आलेल्या प्रशांत किशोर यांच्या तीन तासांच्या भेटीने कलाटणी मिळाली आहे. सूत्रांच्या माहिती नुसार या कलाटणीमागे मुख्य भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांची होती.

  वर्धापनदिनी कार्यकर्ता मार्गदर्शनाचा प्रयत्न
  सूत्रांच्या माहितीनुसार खरेतर खा.सुळे यांनी बंगालच्या निवडणुकांनंतर सर्वप्रथम प्रशांत किशोर यांना संपर्क करून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीच्या वर्धापनदिना निमित्त त्यांना मुंबईत निमंत्रित करून कार्यकर्त्याना मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न होता. मात्र कोरोना निर्बंध आणि प्रशांत यांच्या पूर्वनियोजीत कार्यक्रमांमुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर किशोर यांना मुंबईत लंच करीता आमंत्रित करण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार २०१९च्या विधानसभा निवडणुकांपासूनच खा. सुळे यांची प्रशांत किशोर यांच्या रणनितीनुसार निवडणुकांचे नियोजन करण्याची इच्छा होती. मात्र ती काही कारणांनी पूर्णत्वास जावू शकली नाही.

  कांजूरमार्ग कारशेडबाबत न्यायालयाबाहेर तोडग्याचा प्रयत्न
  दरम्यान, प्रशांत किशोर यांच्या मुंबई भेटीला दोन दिवस आधी झालेल्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या गुप्तगूची पार्श्वभूमी होती. त्यामुळे राजकीय धुरळा वेगाने उडण्यास सुरूवात झाली होती. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यात बंद व्दार चर्चेत आरे कारशेड नंतर कांजूरमार्गच्या कारशेडला केंद्र सरकारकडून मंजूरी देण्याबाबतच्या मुद्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिठागराच्या या जमिनीची मालकी केंद्राच्या मिठागर आयुक्त यांच्याकडे आहे त्यांच्याकडून न्यायालयात राज्याच्या कारशेड प्रकल्पाला हरकत घेण्यात आली आहे. त्याबाबत न्यायालयाबाहेर काही तोडगा काढण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानाना गळ घातल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी मुंबई महापालिकांच्या दृष्टीने शिवसेनेसाठी तसेच भाजपासाठी देखील या मुद्यावरील तोडगा निघणे आवश्यक असल्याचे या सूत्रांनी सांगितले.