मिठी नदी साफ का होत नाही, हे आज कळले – प्रसाद लाड यांची उपरोधिक टीका

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या सचिन वाझेला रविवारी ‘एनआयए’ने बीकेसीजवळ मिठी नदी येथे नेले आणि या नदीतून संगणकाचे सीपीयू, डीव्हीआर, लॅपटॉप, नंबर प्लेट अशा अनेक गोष्टी हस्तगत केल्या आहेत.

  • ‘सरकारचे पाप मिठी नदीतून बाहेर आले आहे, हे मान्य करून मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी’

मुंबई : वारंवार मागणी करूनही बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कुर्ला-बीकेसी येथील मिठी नदीची साफसफाई का होत नव्हती याची उकल आता झाली आहे. नदीची साफसफाई झाली तर सचिन वाझेने केलेली काळी कृत्ये समोर येतील आणि आपले बिंग फुटेल, या भीतीने सरकारकडून मिठीच्या साफसफाईबाबत टाळाटाळ केली जात होती, अशी उपहासात्मक टीका भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली आहे.

अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या सचिन वाझेला रविवारी ‘एनआयए’ने बीकेसीजवळ मिठी नदी येथे नेले आणि या नदीतून संगणकाचे सीपीयू, डीव्हीआर, लॅपटॉप, नंबर प्लेट अशा अनेक गोष्टी हस्तगत केल्या आहेत. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने या गोष्टी मिठी नदीमध्ये टाकल्या गेल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर लाड यांनी ही उपरोधिक टीका राज्य सरकार आणि सरकारमधील नेत्यांवर केली आहे.

“इतकी वर्षे आणि इतके महिने आम्ही मिठी नदी साफ करण्याची आणि त्यातील कचरा बाहेर काढण्याची मागणी करत आहोत. पण त्याकडे राज्य सरकार किंवा शिवसेनेच्या आधिपत्याखालील बृहन्मुंबई महानगरपालिकेने लक्ष दिलेले नाही. मिठी साफ का होत नाही, याचे कारण आज जनतेला कळले आहे. यांची पापे मिठी नदीमध्ये टाकली गेली होती. ही पापे जर लोकांसमोर उघडी पडली तर जनतेसमोर बिंग फुटेल, याची भीती या सरकारला होती,” असेही लाड यांनी म्हटले आहे.

लाड म्हणाले की, वाझेने जे महाघाणेरडे कृत्य केले आहे ते जनतेसमोर आले आहे. “वाझेवर राजकीय वरदहस्त कोणाचा आहे, हेसुद्धा जनतेसमोर लवकरच येईल. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माननीय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेची बाजू घेतली होती. आता तरी त्यांनी आमचे पाप हे लोकांसमोर आले आहे, हे मान्य करून जनतेची आणि विधिमंडळाची माफी मागावी,” असेही लाड यांनी म्हटले आहे.