पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस; जाणून घ्या कोणत्या मुद्द्यावर विरोधक सरकारला घेणार

पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही मित्र पक्षांनी काँग्रेस पक्षाच्या मागणीला केराची टोपली दाखवली, असेही म्हटले जाईल. त्यामुळे आजच्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये काँग्रेस आग्रही असलेल्या कृषी कायद्याबाबत ठराव आणला जाणार का याकडेही लक्ष आहे,

    मुंबई: पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. सोमवारी सभागृहात गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित केलेलया भाजपच्या १२ आमदाराचे पडसाद उमटणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज सभागृहात महाविकास आघाडी सरकारमधील काही भ्रष्टाचाराची प्रकरणे मांडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

    केंद्रातील कृषी कायद्याच्या विरोधातील ठरावाबाबत आज सभागृहात काही घडामोडी घडण्याची शक्यता आहे. वास्तविक जर कृषी कायद्याच्याबाबत काँग्रेसचा केंद्र सरकारविरोधातील ठराव मंजूर झाला नाही तर मात्र पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही मित्र पक्षांनी काँग्रेस पक्षाच्या मागणीला केराची टोपली दाखवली, असेही म्हटले जाईल. त्यामुळे आजच्या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये काँग्रेस आग्रही असलेल्या कृषी कायद्याबाबत ठराव आणला जाणार का याकडेही लक्ष आहे.

    कोरोनाबाबतच्या लसीकरणावरून विरोधपक्ष व राज्य सरकार पुन्हा एकदा आमनेसामने येणार असल्याचे म्हटले आहे. सत्ताधारी पक्ष आज विधिमंडळामध्ये केंद्र सरकारने महिन्याला तीन कोटी लस उपलब्ध करून द्याव्या असा ठराव आणणार असल्याची माहिती समोर येत आहे.