आज सर्जा-राजाचा सण ‘बैलपोळा’, असा साजरा करतात बैलपोळा

  मुंबई : आज पोळा आहे. बैलांचा देखील सण साजरा केला जातो हे शहरातील अनेकांना आश्चर्याचं वाटतं, पण ग्रामीण भागात बैलांचं महत्व शेतकऱ्यांना आजही आपल्या मुलांएवढंच असतं. कारण अनेक मुलींना सासरी जाताना शेतकरी गाय देखील द्यायचे. गाय मुलीला आंदण म्हणजेच भेट दिली जात असे. ही गाय मुलीकडे सासरी पोहोचवली जायची. अर्थातच अशाच गाईंचे वासरू पुढे मोठे झाल्यावर शेतात कामासाठी जुंपले जातात. नकळत ते शेतकऱ्याच्या परिवाराचा भाग बनतात.

  बैलपोळा महाराष्ट्रात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. आज बळीराजा बैलांची सजावट करतात. त्यानंतर बळीराजा पोळ्याच्या कार्यक्रमात भाग घेतो. शेतात बळीराजा आणि बैल ऊन असो वा पाऊस, तरी देखील शेतात राब राब राबतात. जितका कष्ट बळीराजा घेतो तितके कष्ट, बैल देखील शेतात घेतो.

  बैलामुळे शेतकऱ्यांचे बरेचसे श्रम हलके होतात. आजच्या दिवशी बैलाचा सन्मान करण्याचा दिवस असतो, शेतीत आजही बैलामुळे अनेक कामं होतात, जी ट्रॅक्टरने देखील करणे शक्य नाहीत. आज बळीराजा बैलाला सजवतो, विशेष म्हणजे आज बैलाला कोणत्याही कामासाठी जुंपलं जात नाही. कार्यक्रमात ढोल, ताशे वाजवत बैलांची मिरवणूक काढतात. पोळा सण महाराष्ट्रासाठी फार महत्वाचा आहे. या सणाच्या दिवशी बैलांचा थाट असतो. आजच्या दिवशी बैलाला कामापासून आराम असतो. पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळा या सणाच्या दिवशी बैलांना नदी, ओढय़ात नेऊन धुण्यात येते.

  बैल पोळा सण कसा साजरा करतात?

  • सणाच्या निमित्ताने तरी निदान एक दिवस बैलांची पुजा करून नांगरापासून दूर ठेवले जाते.
  • या दिवशी त्यांना उटणे लावून मालीश करुन स्नान करवतात. वेगवेगळ्या प्रकारे त्यांना सजवलं जातं. त्यांना रंगबिरंगी वस्त्रांनी, दाग-दागिन्यांनी सजवण्यात येतं.
  • बैल पोळा सणाच्या दिवशी बैलांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घातली जाते. नंतर त्यांना चारा देऊन घरी आणतात.
  • बैलाच्या खांद्याला तुपाने आणि हळदीने शेकतात. याला खांड शेकणे असे म्हणतात.
  • तसेच त्यांच्या पाठीवर विविध नक्षीकाम केलेली झूल चढवतात, आणि सर्व अंगावर गेरूचे ठिपके देऊन, शिंगांना बेगड बांधतात.
  • काही शेतकरी आपल्या बैलाच्या पाठीवर रंगकाम करून त्याला सजवतात.
  • डोक्याला बाशिंग बांधून, गळ्यात छुम छुम करणार्‍या घुंगरांच्या माळा घातल्या जातात.
  • सगळं काही नवीन , नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घातले जातात.
  • बैलांना गोड पुरणपोळी चा नैवेद्य असतो. बैलाची निगा राखणाऱ्या घरगड्यास नवीन कपडे घेतले जातात.आणि मग गावात बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.