‘पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील कारभाराविषयी सांगण्यासारखे खूप आहे, पण…’ सामनातून भाजपला थेट इशारा

भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत धाड टाकली व महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली.

    महाराष्ट्रात सध्या पुण्यातील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचार प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत धाड टाकली व महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली. याशिवाय लांडगे यांच्या स्वीय सहायकासह त्यांच्या चार साथीदारांनाही अटक करण्यात आली. याच प्रकरणावरु शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे.

    काय म्हटलंय सामनात

    “सगळ्यांच्या डोळ्यांदेखत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या एजंटला ‘लाच’ स्वीकारताना पकडले यास भाजपवाल्यांनी षड्यंत्र म्हणणे म्हणजे भ्रष्टाचाराची व्याख्याच बदलण्यासारखे आहे. असे पैसे इतरांनी स्वीकारले तर तो भ्रष्टाचार, स्वतःचे बरबटलेले हात पोलिसांच्या बेड्यांत अडकले तर तो मात्र षड्यंत्राचा प्रकार! पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस भ्रष्टाचाराचा अजगरी विळखा पडला आहे तो सोडवावाच लागेल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांमधील विद्यमान कारभाराविषयी सांगण्यासारखे खूप आहे, पण या महान शहरांची इज्जत जाईल म्हणून पूर्णविराम देतो!”

    या प्रकरणाची माहिती देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी म्हणाले होते की, लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडमधील जाहिरात होर्डिंग्जची वर्क ऑर्डर पास करण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली होती. ही डिल 6 लाख रुपयांमध्ये अंतिम झाली आणि तक्रारदाराला 1.18 लाख रुपये हप्ते म्हणून देण्यास सांगितलं.”

    दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करुन कारवाइ करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.