नेहरूंचा इतिहास पुसणे हे शौर्य नाही –  संजय राऊत

नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद यांना वगळून स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. ज्यांचा इतिहास घडविण्यात सहभाग नव्हता व देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून जे दूर राहिले अशांकडून स्वातंत्र्य लढ्याचे एक नायक पंडित नेहरूंनाच स्वातंत्र्य लढ्यातून दूर केले जात आहे. हे बरे नाही.

    देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी निर्माण केलेली देशाची संपत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार विकत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाची संपत्ती विकली आणि लाखो तरुण बेरोजगार झाले. आता विषयावरुन खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे.

    काय म्हटलंय सामनात?

    राहुल गांधी, प्रियंका, सोनियांशी मोदी सरकार, भारतीय जनता पक्षाचे भांडण असू शकेल, पण पंडित नेहरूंशी वैर का? नेहरूंनी निर्माण केलेली राष्ट्रीय संपत्ती विकूनच आज सरकार अर्थचक्राला गती देत आहे. स्वातंत्र्य लढ्यातील नेहरूंचे स्थान अढळ आहे. तो इतिहास पुसणे हे शौर्य नाही!

    देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासही बदलला जात आहे काय? यावर आता राजकीय वादळ उठले आहे. ज्यांना इतिहास घडवता येत नाही असे लोक इतिहासाचे संदर्भ पुसण्यातच धन्यता मानतात, ही जगभराची ‘रीत’ आहे. हिंदुस्थानी स्वातंत्र्याचे सध्या 75 वे म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. हिंदुस्थानात इतिहास संशोधनावर काम करणाऱ्या ‘इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ (ICHR) या संस्थेने ‘आजादी का अमृत महोत्सव’च्या पोस्टरवरून पंडित नेहरूंचे चित्र वगळले. या पोस्टरवर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची छायाचित्रे ठळकपणे आहेत, पण पंडित जवाहरलाल नेहरू व मौलाना अबुल कलाम आझाद यांना वगळण्यात आले.

    नेहरू, आझादांना वगळून स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, पण नेहरूंना खासकरून वगळून विद्यमान सरकारने आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडविले. ज्यांचा इतिहास घडविण्यात सहभाग नव्हता व देशाच्या स्वातंत्र्य लढ्यापासून जे दूर राहिले अशांकडून स्वातंत्र्य लढ्याचे एक नायक पंडित नेहरूंनाच स्वातंत्र्य लढ्यातून दूर केले जात आहे. हे बरे नाही. पंडित नेहरू व त्यांच्या काँग्रेस पक्षाविषयी मतभेद असू शकतात. नेहरूंच्या राष्ट्रीय, राजकीय, आंतरराष्ट्रीय भूमिका कदाचित कुणाला मान्य नसतील, पण देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील नेहरूंचे स्थान राजकीय द्वेषापायी पुसून टाकणे हा स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येक सैनिकाचा अपमान आहे.

    दरम्यान, याआधी देशातील बेरोजगारीवरुन केंद्र सरकारला लक्ष करताना संजय राऊत यांनी ‘अंध भक्तांनी सरकारची आरती ओवाळायला व मंदिरांच्या नावाने राजकीय घंटा बडवायला काहीच हरकत नाही.’ अशी खोचक टीका सामनातून केली होती.