भाजपाला तोडीस तोड; शरद पवारांची राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना सूचना

राज्यात पुढील वर्षी 27 जिल्हा परिषदा आणि 23 महानगर पालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील मंत्र्यांची एक बैठक बोलाविली होती. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पवार यांनी मंत्र्यांना महत्त्वाची सूचना केली.

    मुंबई : राज्यात पुढील वर्षी 27 जिल्हा परिषदा आणि 23 महानगर पालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील मंत्र्यांची एक बैठक बोलाविली होती. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत पवार यांनी मंत्र्यांना महत्त्वाची सूचना केली.

    भाजपाला पोषक ठरेल, अशा आघाड्या करू नका, असा सल्ला पवारांनी मंत्र्यांना दिला. बैठकीत सध्याची राजकीय स्थिती आणि आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यात आली.

    या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यात सत्तेचे वाटेकरी असणाऱ्या शिवसेना-काँग्रेससोबत स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये आघाडी करण्यासंबंधी चर्चा झाली. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महामंडळे, मंडळे, शासकीय समित्यांच्या वाटपाबाबतही बैठकीत चर्चा झाली. महामंडळांवर नियुक्त्यांसाठी काही नावे चर्चेत आहे. 15 दिवसांत नावे जाहीर केली जातील, असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

    महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुरू केलेल्या कारवाईबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही, मात्र भाजपाकडून कटकारस्थान सुरू आहे, त्याबाबत कायदेशीर लढाई करणार असल्याचे मलिक म्हणाले.

    शक्य नसेल तेथे स्वबळावर लढणार

    राज्यात पुढील वर्षी मुंबईसह 23 महानगरपालिका, नगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांची तयारी, कुठे मित्र पक्षांशी आघाडी, कुठे स्बळावर लढता येईल, याबाबत बैठकीत चर्चा झाली. सर्वच ठिकाणी शिवसेना, काँग्रेसबरोबर आघाडी शक्य नसेल तरी काही ठिकाणी स्वबळावर आणि काही ठिकाणी दोन किंवा तीन पक्षांची आघाडी करून निवडणूक लढविण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.

    निवडणुकीच्या तयारीसाठी प्रत्येक मंत्र्याकडे एका जिल्ह्य़ाची जबाबदारी देण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सर्वच ठिकाणी आघाडी होईल असे नाही, गरज असेल तिथे तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवतील, स्थानिक परिस्थिती बघून निर्णय घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे मलिक यांनी सांगितले आहे.