मध्य रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळे धास्तावलेल्या कामगारांना अखेर दिलासा, १६०० कामगार तामिळनाडूकडे रवाना

मुंबई: : मुंबईहून तामिळनाडूकडे रवाना होणाऱ्या सुमारे १६०० मजुरांना, रेल्वेच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. शिवसेना खासदार राहुल शेवाळे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मध्यस्तीनंतर या

 मुंबई: : मुंबईहून तामिळनाडूकडे रवाना होणाऱ्या सुमारे १६०० मजुरांना, रेल्वेच्या ढिसाळ व्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. शिवसेना खासदार राहुल शेवाळे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मध्यस्तीनंतर या मजुरांना दिलासा मिळाला. दिवसभराच्या गदारोळानंतर अखेर तामिळनाडूकडे रवाना झालेल्या या मजुरांनी खासदार शेवाळे आणि शिवसेनेचे आभार मानले.

मुंबईत रोजंदारीचे काम करणारे तामिळनाडूमधील सुमारे १६०० मजदूर लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकले. रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारच्या नियमानुसार, या मजदूरांनी मुंबईहून तामिळनाडू येथे जाण्यासाठी, ‘महाराष्ट्र स्टेट तामिळ संघम’च्या माध्यमातून रीतसर अर्ज केला होता. यानुसार मध्य रेल्वेच्या वतीने काल  सकाळी ११.३० वाजता ‘मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस’ येथून ‘मुंबई- तामिळनाडू’ विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. मात्र, या ट्रेनने प्रवास करू इच्छिणाऱ्या मजुरांना केवळ तासभर आधीच रेल्वेच्या वतीने या विशेष ट्रेनबाबत माहिती देण्यात आली. मुंबई शहर आणि उपनगरांत राहणाऱ्या या मजुरांना केवळ तासाभरात सीएसटी स्थानक गाठणे शक्य नव्हते. आपली ट्रेन आता हुकणार किंवा रद्द होणार या भीतीने हे मजूर गोंधळून गेले. त्यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्याशी संपर्क साधला आणि मदत करण्याची विनंती केली. खासदार शेवाळे यांनी परिवहन मंत्री आणि रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून संबधित विशेष ट्रेनची ११.३० ची वेळ संध्याकाळी ५ वाजताची करण्याची विनंती केली, जेणेकरून सर्व मजुरांना ही ट्रेन पकडणे शक्य होईल. खासदार शेवाळे यांच्या विनंतीमुळे अखेर ही ट्रेन सांयकाळी ५.३० वाजता सीएसटी येथून तामिळनाडूकडे रवाना झाली आणि मजुरांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दरम्यान या मजुरांना दुपारचे जेवण आणि पाणी पुरविण्याची व्यवस्थाही करण्यात आली.

विशेष ट्रेन सुटण्याच्या केवळ तासभर आधी रेल्वेच्या वतीने कळविण्यात आल्याने मजुरांचा मोठा गोंधळ उडाला. खासदार राहुल शेवाळे, परिवहनमंत्री अनिल परब यांनी तत्परतेने केलेल्या मदतीमुळेच हे १६०० मजूर आपल्या गावाकडे रवाना होऊ शकले. कष्टकरी आणि सामन्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या शिवसेनेचे मी आभार मानतो. – एस अण्णामलाई, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट तामिळ संघम