तळोजातून ठाणे कारागृहात स्थलांतरित करा, प्रदीप शर्मा यांचा विशेष सत्र न्यायालयात अर्ज

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि कारचा मालक मनसुख हिरेनच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत आहे. हिरेन हत्येप्रकरणी माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे एनआयएच्या रडारवर होते. मात्र, ठोस पुरावे हाती लागत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, याप्रकरणी संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघांना अटक केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावरच प्रदीप शर्मा यांना जूनमध्ये अटक करण्यात आली होती.

  मुंबई – अँटालिया स्फोटकं आणि व्यावसायिक मनसूख हिरेन हत्याकांड प्रकरणात मास्टरमाईंड असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले माजी पोलीस निरिक्षक प्रदीप शर्मा यांनी सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात नव्याने अर्ज दाखल केला आहे. आपल्याला तळोजा मध्यवर्ती कारागृहातून ठाणे कारागृहात स्थलांतरित करावे, अशी मागणी शर्मा यांनी अर्जातून केली आहे.

  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ कारमध्ये आढळलेली स्फोटकं आणि कारचा मालक मनसुख हिरेनच्या हत्येचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत आहे. हिरेन हत्येप्रकरणी माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे एनआयएच्या रडारवर होते. मात्र, ठोस पुरावे हाती लागत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, याप्रकरणी संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघांना अटक केल्यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारावरच प्रदीप शर्मा यांना जूनमध्ये अटक करण्यात आली होती.

  तेव्हापासून शर्मा तळोजा कारागृहात आहेत. त्यातच आपण पोलीस अधिकारी म्हणून सेवेत असताना अनेक प्रकरणामध्ये सराईत गुन्हेगारांना गजाआड धाडले आहे. त्यातील अनेकजण दोषी आढळ्यानंतर तळोजा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्याकडून जीवाला धोका असल्याची भिती शर्मा यांनी अर्जातून व्यक्त केली असून त्यांना तेथून ठाणे कारागृहात स्थलांतरित करण्यात यावे, तसेच शर्मांना घरातून जेवण देण्याची मागणीही अर्जातून करण्यात आली आहे.

  त्यावर विशेष न्यायालयात न्या. ए. टी. वानखेडे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, जून महिन्यात न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतरही अशाच प्रकारचा अर्ज शर्मा यांनी सादर केला होता. तेव्हा, न्यायालयाने कारागृह प्रशासनाला योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र, वारंवार पत्र पाठवूनही कारागृह अधिक्षकांनी अद्याप त्यावर उत्तर दिलेले नाही, असा युक्तिवाद शर्मा यांच्यावतीने बाजू मांडताना अँड. चंदनसिंह शेखावत यांनी केला. त्याची दखल घेत मुंबई महानगर क्षेत्रातील कारागृहाऐवजी पुण्यातील येरवडा किंवा प्रदेशाबाहेरील अन्य मध्यवर्ती कारागृहात स्थलांतरित करण्याबाबत विचार करण्यात यावा, असा सल्ला न्यायालयाने प्रशासनाला दिला आणि घरगुती जेवणाच्या मागणीबाबत कारागृह प्रशासनाला उत्तर सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.

  नरेश गौरचा जामिनासाठी अर्ज

  या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि बडतर्फ सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझेनी वापरलेले सिमकार्ड खरेदी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेला आरोपी नरेश गौरनेही सत्र न्यायालयाच्या एनआयए विशेष न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला असून वाझेने आपल्याला बळीचा बकरा बनविले असल्याचा दावा अर्जातून केला आहे.

  या कटात आपला सहभाग नव्हता आणि त्याबाबत कोणताही माहिती आपल्याला नव्हती, असेही गौरने याचिकेत म्हटले आहे. त्याची दखल घेत न्यायालयाने एनआयएला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश देत सुनावणी १३ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली.