राज्यातील ४५ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, आदेश जारी

नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे. तर पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे. तसेच कोल्हापूर महानिरीक्षकपदाची जबाबदारी मनोजकुमार लोहिया यांच्याकडे देण्यात आली आहे.

मुंबई : नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (कायदा व सुव्यवस्था) आणि मिलिंद भारंबे (गुन्हे) यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस दलातील बहुचर्चित असलेल्या बदल्यांचा आदेश जारी झाला असून विनयकुमार चौबे यांची सुद्धा अतिरिक्त पोलीस महासंचालक येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे. तर पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती झाली आहे. तसेच कोल्हापूर महानिरीक्षकपदाची जबाबदारी मनोजकुमार लोहिया यांच्याकडे देण्यात आली आहे. नाशिकचे महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरूंग महानिरीक्षक आणि प्रताप दिघावकर यांची नाशिकच्या परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे.

नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी बिपीनकुमारसिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रकारे एकूण ४५ जणांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले असून या आदेशावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली आहे.