सेरेब्रल पाल्सीग्रस्त बाळावर स्टेमसेल्स थेरपीचे उपचार

मुंबई : युगांडा येथील तीन आठवड्याच्या बाळाला सेरेब्रल पाल्सी आजार असल्याचे निदान करण्यात आले. मात्र युगांडाहुन भारतात या आजारावर उपचार अधिक चांगले होतात म्हणून वर्षभर पूर्वी मुंबईतील रिजनरेटीव्ह मेडिसिन रिसर्चर डॉ प्रदिप महाजन यांच्या कडे उपचारासाठी आणण्यात आले. डॉक्टरांनी या बाळावार स्टेमसेल्स थेरपीसारख्या उपचार पध्दतीचा अवलंब केला. त्याचा परिणाम आता वर्षभरानंतरही चांगला दिसून येत आहे असे आजच्या जागतिक सेरेब्रल पाल्सी दिनी सांगण्यात आले.

हे बाळ जन्मानंतर रडले नसल्याने एनआयसीयु मध्ये दाखल करण्यात आले. युगांडात तीन आठवडे या बाळावर झालेल्या उपचारानंतर त्याच्या प्रकृतीमध्ये काहीशी सुधारणा झाली. नंतर हे बाळ मुंबईतील रिजनरेटीव्ह मेडिसिन रिसर्चर डॉ प्रदिप महाजन यांच्याकडे पुढील उपचारासाठी दाखल झाले.

डॉ महाजन यांनी सांगितले की, सेरेब्रल पाल्सी असणारे मूल स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तसेच त्यांच्या हाताच्या तसेच पायांच्या स्नायूंमध्ये ताठरता वाढते. जरी हा प्राथमिकदृष्ट्या हालचालींवर मर्यादा आणणारा विकार असला तरी मेंदूतील ज्या भागावर हा परिणाम घडवतो, त्यानुसार रुग्णाच्या आकलनक्षमता, शिकणे, बुद्धी, स्वभाव, संवाद, वाचा, संवेदना, श्रवण तसेच दृष्टीवर परिणाम घडवतो. हा आजार गंभीर स्वरूपाचा असला तरी योग्य वेळी उपचार केल्यास निश्चितच चांगले बदल दिसून येतात. त्यामुळे निराश न होता औषधोपचार, आहार व व्यायाम या गोष्टींमध्ये सातत्य ठेवल्यास आपण सेरेब्रल पाल्सिग्रस्त बाळाला चांगले आयुष्य नक्कीच देवू शकतो. स्टेमसेल्स थेरपी सारख्या उपचार पध्दतीमुळे अशा गंभीर आजाराशी लढण्यास फायदेशीर ठरत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊन काळात युगांडातील या बाळावर मुंबईतून ही स्टेम थेरपीचे उपचार सल्ले सुरु असून बाळ प्रगती करत असल्याचे सांगण्यात आले.