पावसाळ्यापुर्वी झाडांची योग्य छाटणी करण्यासाठी ऑनलाईन परवानगी घेण्याचे महापालिकेचे आवाहन

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा महापालिकेद्वारे नियमितपणे घेण्यात येत असते. तथापि, सोसायटी, शासकीय - निमशासकीय संस्था, खाजगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या

 बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा महापालिकेद्वारे नियमितपणे घेण्यात येत असते. तथापि, सोसायटी, शासकीय – निमशासकीय संस्था, खाजगी जागा इत्यादींमध्ये असणाऱ्या झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. पावसाळ्याच्या काळात झाडे पडून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन याबाबत सर्व संबंधितांनी महापालिकेच्या पूर्व परवानगीने आपल्या परिसरातील अवास्तव वाढलेल्या झाडांच्या फांद्या सुयोग्य व शास्त्रीय पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असे आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आले आहे. या अनुषंगाने आवश्यक ती परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज पूर्वीप्रमाणेच महापालिकेच्या विभाग कार्यालयात स्वीकारण्यात येत आहे. पण त्याचबरोबर  नागरिकांना घर बसल्या वृक्ष छाटणी परवानगी परवानगीसाठी अर्ज करण्याची सुविधा महापालिकेच्या “MCGM 24×7” या भ्रमणध्वनी आधारित अँड्रॉइडवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त मृत झालेल्या किंवा किडीचा प्रादुर्भाव असलेल्या झाडांबाबत अथवा सकृतदर्शनी धोकादायक झालेल्या झाडाबाबत महापालिकेच्या नागरी सेवा सुविधा विषयक १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. याबाबत महापालिकेच्या विभाग कार्यालयातील कनिष्ठ वृक्ष अधिकाऱ्यांशी देखील संपर्क साधावा किंवा त्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कार्यवाही पावसाळ्यापूर्वी करवून घ्यावी, असेही आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे)  अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात उद्यान खात्याची एक विशेष बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त महोदयांनी उद्यान विभागाला पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेची पूर्व परवानगी घेऊन झाडांची छाटणी पावसाळ्यापूर्वीच करण्याचे आवाहन महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे करण्यात आले आहे.वर्ष २०१८ मध्ये झालेल्या वृक्ष गणनेनुसार महापालिका क्षेत्रात साधारणपणे २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खाजगी आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त १ लाख ८५ हजार ३३३ झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित १ लाख १ हजार ६७ एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत, अशी माहिती उद्यान खात्याद्वारे देण्यात आली आहे.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम, १९७५’ नुसार महापालिका क्षेत्रातील झाडांची छाटणी किंवा मृत / धोकादायक झाड कापावयाचे झाल्यास त्याबाबत महापालिकेद्वारे पूर्व परवानगी प्राप्त करुन सुयोग्य छाटणी करणे बंधनकारक आहे. तसेच छाटणी झाल्यानंतर झाडाच्या तोडलेल्या फांद्या व इतर कच-याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही संबंधितांचीच आहे. तथापि, महापालिका नियुक्त ठेकेदाराद्वारे छाटणी केल्यास कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याची कार्यवाही ठेकेदाराद्वारेच केली जाते. महापालिका नियुक्त ठेकेदाराद्वारे झाडाची छाटणी करावयाची झाल्यास महापालिकेच्या नियमांनुसार विहित शुल्क पालिकेच्या विभाग कार्यालयाकडे जमा केल्यानंतर सामान्यपणे त्यापुढील ७ दिवसांत झाडांच्या छाटणीची प्रक्रिया केली जाते. या तपशीलानुसार महापालिका क्षेत्रातील सर्व खाजगी जागा, शासकीय – निमशासकीय जागांमधील झाडांची छाटणी ही महापालिकेच्या पूर्व परवानगीनुसार पावसाळ्यापूर्वीच करावी, जेणेकरुन संभाव्य जीवित अथवा वित्तहानी टाळता येईल; असे आवाहन उद्यान अधीक्षक परदेशी यांनी केले आहे.