पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघात झाडांची कत्तल होते तर भाजपा आमदारांच्या मतदारसंघात झाडं लावण्याचा संकल्प होतो : प्रविण दरेकर

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार मनीषा चौधरी यांनी ऑक्सिजनपूरक ५००० वृक्षांच्या वृक्षारोपणाचा संकल्प सोडला. ठाकूर कंपाउंड, बोरिवली येथे झालेल्या या कार्यक्रमात दरेकर बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, स्वतः आमदार मनीषा चौधरी उपस्थित होते.

  मुंबई: एका बाजूला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघात पर्यावरण दिनाच्या दिवशी झाडांची कत्तल होते. त्याच दिवशी ‘वसुंधरा अभियान’ नावाचे अभियान वन खात्यामार्फत जाहीर केले जाते. सध्या असलेली झाडे तोडायची आणि वसुंधरा अभियान राबवण्याची घोषणा करायची हा विरोधाभास एकीकडे आहे आणि भाजपची झाडं लावणं, ती वाढवणे आणि तीच संरक्षण करण्याची भूमिका आहे, असा तिरकस टोला आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.

  भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार मनीषा चौधरी यांनी ऑक्सिजनपूरक ५००० वृक्षांच्या वृक्षारोपणाचा संकल्प सोडला. ठाकूर कंपाउंड, बोरिवली येथे झालेल्या या कार्यक्रमात दरेकर बोलत होते. या कार्यक्रमाला खासदार गोपाळ शेट्टी, स्वतः आमदार मनीषा चौधरी उपस्थित होते.

  दरेकर म्हणाले, मनीषाताई यांच्या आशीर्वादाने हा संकल्प सोडला जात आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांनी जे जे संकल्प या जिल्ह्यासाठी केले त्या संकल्पाना पूर्ण करण्याचे काम उत्तर मुंबईमधील कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यांनी रक्तदानासारखा संकल्प करोना काळात केला होता, ५००० बाटल्या रक्त जमा होण्याबाबत अनेकांनी थट्टा उडवली होती, पण तोही संकल्प पूर्ण झाला.

  झाडांची संख्या कमी होत असून वातावरणात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. करोना काळात सर्वांनाच ऑक्सिजनचे महत्व पटले आहे. त्यामुळे सर्वांनीच झाडांचं रक्षण केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त करून मागठाणे विधासभा क्षेत्रात देखील १००० झाडं लावण्याच नियोजन करणार असल्याचं आश्वासन दरेकर यांनी दिले.

  पहिल्याच पावसात महापालिका आपत्ती व्यवस्थापन अपयशी

  यावेळी दरेकर यांनी महापालिकेच्या कारभारावर देखील टीका केली. ते म्हणाले, काल मुंबईत पाणी साचले, आम्ही पाहणी करण्यासाठी गेलो होतो, गांधी मार्केटमध्ये प्रवाशांनी भरलेली एक एसटी अडकून पडली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. पण एसटीला काढायला ५ तास क्रेन मिळाली नाही. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच हे अपयश आहे.

  शिवसेनेने सामाजिक बांधिलकीचे व्रत।कधीच सोडले

  कधीकाळी सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेनेकडे पाहिले जायचे. पण आता कोणत्याही संकटात शिवसेना कार्यकर्ते, खासदार, नगरसेवक रस्त्यावर दिसत सुद्धा नाहीत. तीच सामजिक बांधिलकी आता भाजप निभावत आहे. शिवसेनेला सत्तेचा मुकुट मिळाला असल्यामुळे स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेली सामाजिक बांधिलकी शिवसेना विसरली आहे.

  कोरोन संकट, निसर्ग चक्रीवादळ, तौक्ते संकट किंबहुना काल आलेलं पावसाचं संकट असेल प्रत्येक वेळेला भाजपचा लोकप्रतिनिधी, कार्यकर्ता लोकांच्या मदतीचा धावून गेला आहे, असे दरेकर म्हणाले.