तिसऱ्या लाटेत कोविड रुग्ण लवकर बरे होण्यासाठी मोनोक्लोनल अॅण्टीबॉडीजची किंमत कमी करण्यासाठी केंद्र पातळीवर प्रयत्न करा; डॉ. दिपक सावंत यांचे मुख्यमंत्र्याना पत्र

राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ दिपक सावंत यानी कोविड रुग्णांना लवकर बरे करणाऱ्या मोनोक्लोनल अॅण्टीबॉडीजची किंमत कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यानी केंद्र पातळीवर प्रयत्न करावेत, अशी विनंती करणारे पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यानी म्हटले आहे की, रूग्ण दाखल झाल्यानंतर ७२ तासात मोनोक्लोनल पद्धतीने अॅण्टीबॉडीज दिल्यास त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. मात्र ही पध्दत खर्चिक असल्याने तिची किंमत कमी केल्यास अधिकाधिक रूग्णाना हा उपचार देणे शक्य होणार आहे.

    मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ दिपक सावंत यानी कोविड रुग्णांना लवकर बरे करणाऱ्या मोनोक्लोनल अॅण्टीबॉडीजची किंमत कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यानी केंद्र पातळीवर प्रयत्न करावेत, अशी विनंती करणारे पत्र पाठविले आहे. या पत्रात त्यानी म्हटले आहे की, रूग्ण दाखल झाल्यानंतर ७२ तासात मोनोक्लोनल पद्धतीने अॅण्टीबॉडीज दिल्यास त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. मात्र ही पध्दत खर्चिक असल्याने तिची किंमत कमी केल्यास अधिकाधिक रूग्णाना हा उपचार देणे शक्य होणार आहे.

    कृत्रिम पध्दतीने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत

    राज्यात सध्या डेल्टा प्लस व्हेरिएन्टच्या प्रसार होण्याची भिती आहे. हा व्हेरियंट रूग्णामध्ये आढळून आल्यास रूग्णाला तातडीने उपचार देण्यात यायला हवे अन्यथा या संसर्गामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. कोविड रुग्णाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर ७२ तासांच्या आत मोनोक्लोनल या कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या अॅण्टीबॉडीज् दिल्यास कृत्रिम पध्दतीने रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते आणि त्याचा जिव वाचविता येवू शकतो. असे डॉ सावंत यांचे म्हणणे आहे.

    पुन्हा बूस्टर डोस देण्याची आवश्यकता

    डॉ. सावंत स्वत: नुकतेच कोरोनाग्रस्त झाले होते. त्यांनी त्यापूर्वी १६ जानेवारी आणि नंतर १६ फेब्रुवारी रोजी कोविडप्रतिबंधक पहिली आणि दुसरी मात्रा घेतली होती. त्याला सहा महिने पूर्ण होताना १७ जून रोजी त्यांना करोनाची लागण झाली. त्यामुळे दोन डोस घेतल्यानंतरही कोविडची लागण झाल्याने लस घेतल्यानंतरही त्याचा प्रभाव सहा महिन्यांपेक्षा जास्त काळानंतर कायम राहण्यासाठी पुन्हा बूस्टर डोस देण्याची आवश्यकता असल्याचे मतही डॉ सावंत यांनी व्यक्त केले आहे.

    राज्य व केंद्राच्या माध्यमातून संशोधन आवश्यक

    डॉ. सावंत यांनी या पत्रात म्हटले आहे की, ‘डेल्टा प्लस व्हेरिएन्ट हा थोडाफार रहस्यमय वाटतो. मात्र, त्याचा घातकपणा रोखण्यासाठी तातडीने निदान केल्यास, तसेच रुग्णावर वेळेत उपचार केल्यास महाराष्ट्रात येणारी कोविडची तिसरी लाट रोखता येऊ शकते. कोणतीही लस आपल्याला शंभर टक्के रोगप्रतिकारक शक्ती देत नाही, हे खरे असले; तरी देशात देण्यात येणाऱ्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची मात्रा किती दिवस-किती महिने उपयुक्त ठरू शकते, यावर राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून संशोधन होणे आवश्यक आहे असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.