ममता बॅनर्जींच्या यशात अदृश्य हात कुणाचा? राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये रंगला वाद

शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ द्यायला लावल्याने मतविभागणी रोखली गेली, असं वक्तव्य भाजपच्या कैलास विजयवर्गीय यांनी केलं होतं. त्यावरून बंगालमधील तृणमूलच्या यशात पवारांचा अदृश्य हात होता, असं ट्विट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आशिष शेलार यांनी त्याची खिल्ली उडवलीय. 

    यशाचे दावेदार अनेक असतात, मात्र पराभवाचा धनी कुणीच नसतो, असं म्हटलं जातं. राजकारणात तर ही म्हण अनेकदा खरी ठरताना दिसते. सध्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निकालाबाबत असंच चित्र निर्माण झालेलं दिसतंय. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसला यश मिळण्यामागे शरद पवारांचा हात असल्याचा राष्ट्रवादी नेत्यांचा दावा फेटाळून लावत भाजपनं त्याची खिल्ली उडवलीय.

    शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ द्यायला लावल्याने मतविभागणी रोखली गेली, असं वक्तव्य भाजपच्या कैलास विजयवर्गीय यांनी केलं होतं. त्यावरून बंगालमधील तृणमूलच्या यशात पवारांचा अदृश्य हात होता, असं ट्विट राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलं. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आशिष शेलार यांनी त्याची खिल्ली उडवलीय.

    यशामध्ये दावेदार कोण, असा सवाल करत उभे, आडवे आणि छुपे हात कुणाचे आहेत, हे हात चिन्ह असणाऱ्या काँग्रेसनं ठरवावं, अशी प्रतिक्रिया शेलार यांनी दिलीय. या निवडणुकीत डावे आडवे झाले, तर काँग्रेसचं बाष्पीभवन झालं. यामागे पवारांचा हात असेल ही काँग्रेससाठीच चिंतेची बाब असल्याचं त्यांनी म्हटलंय.

    डावे, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या सर्व पक्षांच्या तुलनेत भाजपला मिळालेलं यश हे घवघवीत असल्याचंही शेलार यांनी म्हटलंय. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत विचार करता भाजपएवढे यश इतर कुठल्याच पक्षाला मिळालं नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.