दोन मंत्री पॉझिटिव्ह, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड होम क्वारंटाईन; राज्यकर्त्यांच्या चिंतेत भर

राज्यातील दोन मंत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्यामुळे राज्यकर्त्यांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि मंत्री संदीपान भुमरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड होमक्वारंटाईन झाल्या आहेत.

    मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राज्य सरकार मिशन बिगीन अगेन ऐवजी आता राज्यात ‘ब्रेक दी चेन’च्या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर 30 एप्रिलपर्यंत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची सोमवारी रात्रीपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.

    अशातच, राज्यातील दोन मंत्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाल्यामुळे राज्यकर्त्यांच्या चिंतेत पुन्हा भर पडली आहे. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख आणि मंत्री संदीपान भुमरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तर, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड होमक्वारंटाईन झाल्या आहेत.

    मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: फेसबुक पोस्टद्वारे याबाबतची माहिती दिली. गडाख यांना सध्या होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. दुसरीकडे, शिवसेना नेते आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांचाही कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्यातील तिघांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्या क्वारंटाईन झाल्या आहेत.

    देशातील कोरोनाची स्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहे. या बैठकीत कोरोना संक्रमणाची समीक्षा केली जाईल. तत्पूर्वी, त्यांनी रविवारी एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, कोविड नियमांचे पालन आणि लसीकरण या पाच कलमी कार्यक्रमावर भर देण्याची सूचना केली होती.