प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

आरोग्य विभागाची रखडलेली परीक्षा येत्या 28 फेब्रुवारीला होत आहे. मात्र एकाच दिवशी दोन पेपर, तेही वेगवेगळ्या शहरात होत असल्याने ते द्यायचे तरी कसे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. दोन पेपर् सेंटरमधील अंतर 500 किमी पेक्षाही जास्त आहे. यामुळे कोणताही एक पेपर देण्याचाच पर्याय विद्यार्थ्यांपुढे उरला आहे.

    मुंबई (Mumbai). आरोग्य विभागाची रखडलेली परीक्षा येत्या 28 फेब्रुवारीला होत आहे. मात्र एकाच दिवशी दोन पेपर, तेही वेगवेगळ्या शहरात होत असल्याने ते द्यायचे तरी कसे असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. दोन पेपर् सेंटरमधील अंतर 500 किमी पेक्षाही जास्त आहे. यामुळे कोणताही एक पेपर देण्याचाच पर्याय विद्यार्थ्यांपुढे उरला आहे.

    विद्यार्थ्यांच्या हातात आज रविवारी सकाळी परीक्षेचे हाॅल तिकीट पडले. ते पाहून विद्यार्थ्यांचे डोकेच चक्रावले. त्यांनी अपेक्षित परीक्षा सेंटरसाठी दिलेल्या पर्यायांपैकी एकही परीक्षा सेंटर त्यांना मिळालेले नव्हते. त्याही दोन्ही पेपर एकाच दिवसाला आणि दोन्ही सेंटरमधील अंतर 500 कि.मी. पेक्षाही जास्त होते. पर्यायी, कोणताही एक पेपर देण्याशिवाय आता विद्यार्थ्यांपुढे पर्याय उरलेला नाही. शेवटी आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान कोण भरून देणार? असा संतप्त प्रश्न काही विद्यार्थ्यांनी विचारला.

    या परीक्षेसाठी जवळपास तीन लाख विद्यार्थी बसले आहेत. अनेक वर्षे रखडलेली आरोग्य विभागाची ही परीक्षा घेण्यात येत आहेत. मंत्री राजेश टोपे दिलेल्या दीर्घ मुलाखतीत यांनी ही परिक्षा घेत आहोत असे जानेवारी महिन्यात घोषित केलं होतं. आज परीक्षेसाठी प्रवेश पत्र आल्यानंतर परीक्षा कोणत्या-कोणत्या केंद्रावर होणार आहेत ते स्पष्ट झालं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असल्याचं दिसून येतंय. दुसरीकडे कोरोनाचा प्रभाव वाढत असताना परीक्षा न थांबवण्याचं सरकारचं धोरण दिसते आहे.

    राज्य सरकारच्या वतीनं 2019 मध्ये आरोग्य विभागाची जाहिरात काढण्यात आली. या जाहिरातीमध्ये 52 केंद्रासाठी विद्यार्थी अर्ज करु शकतात असं सांगण्यात आलं होतं. काही विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला. परंतु मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकारने अशा विद्यार्थ्यांना कॅटेगरी बदलण्याची मुभा दिली. काही विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून अर्ज केला परंतु राज्य सरकारने कंपल्सरी अशा विद्यार्थ्यांना दोनच पदांसाठी परीक्षा देण्यासाठी हॉल तिकीट वितरीत केले. एखादा विद्यार्थी सकाळी मुंबईला परीक्षा देत असेल तर त्याच विद्यार्थ्याला औरंगाबाद मध्ये दुपारी दुसऱ्या पदासाठी परीक्षा द्यावी लागेल.

    विद्यार्थी ठरवतील त्यांना कुठली परीक्षा द्यायची? कुठल्या पदावर बसायचं? कुठल्या जिल्ह्यात परीक्षा द्यायची? राज्य सरकार कसं काय मनाप्रमाणे लकी ड्रॉ सारखे दोन विषय निवडेल? राज्य सरकार या विद्यार्थ्यांना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी एका तासामध्ये कुठलीही यंत्रणा उपलब्ध करुन देईल का त्याचा खुलासा करावा अशी मागणी विद्यार्थ्यांमध्ये होत आहे. सरकारने तात्काळ विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याप्रमाणे सर्व हॉल तिकीट वितरीत करावे व विद्यार्थिनी निवडलेल्या प्राधान्याच्या जिल्ह्यामध्येच सेंटर द्यावे. अगोदरच विद्यार्थी खचलेला आहे. पुन्हा अशा गोष्टींमुळे तो अजून अडचणीत येईल, याकरिता राज्य सरकारने तात्काळ निर्णय बदलावा अशीही मागणी करण्यात येत आहे.