उद्धव ठाकरे यांनी बिगर भाजपशासित राज्याचे नेतृत्व करावे : खा. संजय राऊत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवण्याची मागणी सामनातून केल्यांनतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसमोर तिचा पुनरूच्चार केला आहे. उद्धव ठाकरे यांनी बिगर भाजपशासित राज्याचे नेतृत्व करावे, असे संजय राऊत यांनी वाहिन्यांशी बोलताना म्हटले आहे. महाराष्ट्र, तेलंगण, केरळ, तामिळनाडू, झारखंड, राजस्थान, पश्चिम बंगाल, ओरिसा, पंजाब, आंध्र प्रदेश ही बिगर भाजपशासित राज्ये आहेत. कालच या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी न घाबरता एकजूट करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभुमीवर त्यांनी राष्ट्रीय राजकारणात पाऊल ठेवण्याची मागणी ‘सामना’तून पूर्वीच करण्यात आली होती असे राउत म्हणाले.
दरम्यान देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त काम करत आहेत. देशाच्या इतिहासात त्यांचे नाव घेतले जाईल, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.

यावेळी बोलताना संजय राऊत यांनी शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी नाराजीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवल्याबाबत भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की, “तीन पक्षांचे सरकार असताना थोडी नाराजी असतेच. संजय जाधव मुंबईत आलेले आहेत, यातून मार्ग निघेल. महाविकास आघाडी सरकारमध्ये उत्तम समन्वय आहे. जी समन्वय समिती आहे ती सरकारच्या कामकाजासाठी आहे. तिन्ही पक्षांतर्गत समन्वय समितीची गरज नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु गरज पडल्यास पुन्हा विचार करु.”

मागील काही दिवसात निधी वाटपावरुन काँग्रेस आमदार नाराज असल्याचे सांगण्यात येत होते. याबाबत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टिका केली. “तीन पक्षाचं सरकार असताना निधी वाटपास आमदार आणि खासदारांची नाराजी आहे. पण केंद्राने निधी गोठवल्यामुळे अडचण आहे,” असे संजय राऊत म्हणाले. निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप करत जालन्याच्या कॉंग्रेस आमदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्याशी संवाद साधला आणि निधी वाटपात दुजाभाव केला जाणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर त्यांचे उपोषण रद्द करण्यात आले.