कोपर्डी खटल्यावर सुनावणी घेण्यास खंडपीठ असमर्थ; अन्य खंडपीठासमोर होणार सुनावणी

संपूर्ण राज्याला हादरून सोडलेल्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खून खटल्यात दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींनी शिक्षेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे या याचिकेवर आता अन्य खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

    मुंबई : संपूर्ण राज्याला हादरून सोडलेल्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खून खटल्यात दोषी ठरविण्यात आलेल्या आरोपींनी शिक्षेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे या याचिकेवर आता अन्य खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

    कोपर्डीतील १५ वर्षे वयाच्या शालेय मुलीवर तिघा नराधमांनी अत्याचार करून तिचा अत्यंत निर्दयपणे खून केल्याच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. एकवटलेल्या सकल मराठा समाजाने मोर्चे काढले. अनेक संघटनांनी आंदोलने केली. त्यानंतर गावालगतच्याच वस्त्यांवर राहणारे जितेंद्र ऊर्फ बाबुलाल शिंदे (२५), संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीचंद भैलुमे (२६) या तिघा आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

    जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या आरोपींना कट रचून मुलीवर अत्याचार करणे, तिचा खून करणे, बालकांच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार १८ नोव्हेंबरला २०१७ ला तिघांही आरोपींना दोषी ठरवून २९ नोव्हेबरला फाशीची शिक्षा ठोठावली. या खटल्यातील दोषी आरोपी नितीन गोपीनाथ भैलूम यांने औरंगाबाद उच्च न्यायालयातील हा खटला वर्ग करण्याची विनंती तत्कालीन मुख्य न्या. प्रदीप नंदराजोग यांनी मान्य करत खटला मुंबई उच्च न्यायालयात वर्ग केला.

    आरोपींनी शिक्षेविरोधात दाखल केलेले अपील आणि शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारच्या याचिकांवर फेब्रुवारी २०२० मध्ये एकत्रित सुनावणी घेण्याचे न्या. रणजीत मोर यांच्या खंडपीठाने निश्‍चित केले होते. दरम्यान कोविडमुळे या याचिकांवरील सुनावणी प्रलंबित आहे. आता निर्बंध शिथील झाल्याने या खटल्यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती करणारा अर्ज अ‍ॅड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी केला होता.

    या अर्जाची दखल घेऊन या याचिकेची सुनावणी न्या. साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर निश्‍चित करण्यात आली होती. मात्र, खंडपीठाने याचिकेवर सुनावणी धेण्यास असमर्थता दर्शविली .त्या मुळे या याचिकेवर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या.व्ही जी.बिस्ट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी अपेक्षित आहे.