‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा मारलेली ११३ एकर जमीन मोकळी केली – गोपीचंद पडळकर

पडळकर यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, मात्र त्यांच्या सातत्याच्या टीकेच्या रोख हा पवार कुटुंबीयांकडे आहे. त्यामुळे, यावेळीही त्यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष्य केल्याचे दिसून येते.

    भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सातत्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत काही महिन्यापूर्वी जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या पुतळ्याचे गनीमी कावा पद्धतीने अनावरण करत त्यांनी पवार कुटुंबीयांनी मोठी टीकाकेली होती . त्यानंतर आता पुन्हा एकदा जेजुरी मंदिर देवस्थानच्या जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाचे आभार मानत पवार कुटुंबीयांवर शाब्दिक हल्लाबोल केल्याचे समोर आले आहे.

    आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे आभारी आहोत, कारण श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या भक्तांना पंरपरागत मिळालेल्या देवस्थानच्या जमिनी ‘काका-पुतण्याच्या’ टोळीने ‘मुळशी पॅटर्नद्वारे’ कब्जा मारलेली ११३ एकर जमीन मोकळी केली. आता लवकरच यांचे पितळ जगापुढे उघडे पडणार आहे. ।।यळकोट यळकोट जय मल्हार।।

    असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. पडळकर यांनी कुणाचेही नाव घेतले नाही, मात्र त्यांच्या सातत्याच्या टीकेच्या रोख हा पवार कुटुंबीयांकडे आहे. त्यामुळे, यावेळीही त्यांनी पवार कुटुंबीयांना लक्ष्य केल्याचे दिसून येते.

    खंडेरायाच्या जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण उद्या शरद पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार होते. मात्र, उद्घाटनादिवशीच अचानक पहाटे गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहचले आणि त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जेजुरी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांमधे झटापटदेखील झाली. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याचं गोपीचंद पडळकर यांनी जाहीरही केलं. आता, तेथील जमिनीसंदर्भात त्यांनी ट्विट करुन महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.