दुर्दैवाने आपण अल्पवयीनांसाठी सुरक्षित समाज निर्मिती करण्यास अपयशी, उच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत

२०१८ मध्ये पीडिता गौरवला भेटली होती. तेव्हा, त्याने तिच्या खासगी अवयवांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने तिला व्हॉट्सअँपवर अश्लिल संदेश पाठविण्यास सुरुवात केली. गौरव हा आपल्या वडिलांचा भाऊ असल्याने पीडिता घरी खुलासा करू शकली नाही. घटनेच्या दिवशी पीडितेच्या मैत्रिणीने तिच्या आईला सारी हकीगत सांगितली.

    मुंबई – पालक, शिक्षक आणि प्रौढ नागरिक आपल्या अल्पवयीन पाल्यांसोबत झालेल्या लैंगिक गैरवर्तणुकीला ओळखू शकतील आणि त्यांना एक सुरक्षित वातावरण प्रदान करू शकतील अशा समाजाची निर्मिती करण्यास आपण दुर्दैवाने कमी पडत आहोत, अशी खंत मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान व्यक्त केली आणि १७ वर्षीय मुलीचा छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या नराधमाला जामीन देण्यास नकार दिला.

    ६ सप्टेंबर २०२० पुण्यातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्याच्या बाल्कनीतून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने उडी मारून आत्महत्या केली. घटनेच्या तीन महिन्यांनंतर मुलीच्या आईने मुलीचा चुलत काका गौरव नारखेडेविरोधात पुण्यातील भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गौरव आपल्या मुलीला मेसेजमार्फत त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा दावा केला. पीडितेच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गौरव हा आपल्या पतीचा चुलत भाऊ असून तो औरंगाबाद येथे राहतो.

    २०१८ मध्ये पीडिता गौरवला भेटली होती. तेव्हा, त्याने तिच्या खासगी अवयवांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्याने तिला व्हॉट्सअँपवर अश्लिल संदेश पाठविण्यास सुरुवात केली. गौरव हा आपल्या वडिलांचा भाऊ असल्याने पीडिता घरी खुलासा करू शकली नाही. घटनेच्या दिवशी पीडितेच्या मैत्रिणीने तिच्या आईला सारी हकीगत सांगितली. आईने पीडितेला विचारणा केली असता तिने त्याबाबत सारी माहिती तसेच अश्लिल संदेश आईला दाखवून मोबाईल तिथेच टाकून दुसऱ्या बेडरुमच्या बाल्कनीतून उडी मारली. याप्रकरणी आरोपीला अटक करून पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला.

    त्याविरोधात आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला. आरोपीने आपल्या सर्व मर्यादा ओलांडल्या आणि पुतणीला अश्लिल संदेश पाठवून नैतिक अपराध केला आहे. मात्र, पीडितेने जे टोकाचे पाऊल उचलले तो तिच्याकडचा अंतिम आणि एकमेव पर्याय नव्हता, अन्य मार्गांनीही समस्या सोडवता आली असती, असा युक्तिवाद आरोपीच्यावतीने अँड. आबाद पोंडा यांनी केला.

    त्यावर न्या. भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. त्या निकालाची प्रत नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यानुसार, सगळ्या प्रकारामध्ये गुरफटले गेल्याची भावना निर्माण झाली. मोबाईलवरील संदेशाच्या स्क्रीनशॉटमुळे हे सिद्ध होते की, आरोपी हा पीडितेचा तीव्र विरोध असतानाही सतत छळ करत होता. त्यामुळेच पिडीता आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली, असे स्पष्ट करत न्यायालयाने नराधमाला जामीन देण्यास नकार दिला.

    न्यायालयाचे निरीक्षण 

    या प्रकरणातील पीडितेला तिचा काका वडिलांप्रमाणे होता, त्याच्याकडून अशा प्रकारची वर्तवणूक तिच्यासाठी धक्कादायक होती. त्यामुळे ती मानसिक, शारीरिक छळ आणि कौटुंबिक मानमर्यादेच्या कात्रीत सापडली होती. पीडिता ही पौगंडावस्थेत होती. यामुळे ती नैराश्येच्या गर्तेत अडकली. वर्षभर पीडिता काकाकडून होणारा लैंगिक छळ सहन करत होती, असे निरीक्षण नोंदवत लैंगिक शोषणाला कोणत्याही सीमा नसतात.

    पीडीता ही प्रौढ नसून पौगंडावस्थेत होती, या वयात तिला कधीही पुसल्या जाणार नाहीत आणि भरुनही येणार नाहीत अशा भयंकर आठवणी मिळाल्या. या संदर्भात वाच्यता केल्यास कोणाचाही विश्वास बसणार नाही किंवा त्याच्या ठपका आपल्यावरच ठेवण्यात येईल, या भीतीने तिला ग्रासले होते. त्या भीती आणि मानसिक एकटेपणामुळे तिने स्वतःचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला असल्याचे निरीक्षण न्या. डांगरे यांनी आदेशात नोंदवले.