कपिल पाटलांना केंद्रीय मंत्रिपद, विमानतळ नामांतरासाठी आग्रही स्थानिक आगरी समाजाची मनधरणी; महापालिका निवडणूकांसह, तीन जिल्ह्यांचे राजकीय गणित!

महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची ही रणनीती असल्याचे बोलले जात आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी, कुणबी आणि बहुजन समाजाने नुकताच दि बा पाटील यांच्या विमानतळाला नाव देण्याचा लढा पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवत उभारला आहे.

    मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या मंत्रिमंडळात काल भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रात राज्यमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोश केला. कल्याण, भिवंडीसह ठाणे जिल्ह्यात तसेच नवीमुंबई, पनवेल आणि रायगड जिल्ह्यात दि. बा. पाटील यांचे नांव नव्या विमानतळाला द्यावे म्हणून शिवसेनेविरोधात एकवटलेल्या स्थानिक समाजाला त्यामुळे आनंदाचे भरते आले आहे. या परिसरातील गावात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थानी आनंदोत्सव साजरा केला.
    ग्रामीण भागात भाजपचे बस्तान बसविण्याचा हेतू
    कपिल पाटील यांना मंत्रिपद देण्यामागे भाजपचे येत्या काळात महानगर पालिका निवडणुका तसेच विमानतळाच्या लढ्यासाठी शिवसेनेवर नाराज होवून एकवटलेल्या स्थानिक आगरी-कोळी समाजाला गोंजारण्याचे विशेष राजकीय गणित असल्याची देखील चर्चा आहे. नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश आहे. भिवंडीचे कपिल पाटील यांना पंचायती राज राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामिण भागात भाजपचे बस्तान बसविण्याचा हेतू त्यातून लपून राहिला नसल्याचे ,मानले जात आहे.

    महत्वाच्या महापालिका निवडणुकीचे गणित
    येत्या काळात वसई विरार, कल्याण डोंबिवली नवी मुंबई, ठाणे, पनवेल उल्हासनगर, तसेच मुंबई अश्या महत्वाच्या महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजणार आहेत. महापालिका निवडणुकीत शिवसेनेला शह देण्यासाठी भाजपची ही रणनीती असल्याचे बोलले जात आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र असलेल्या आगरी-कोळी, कुणबी आणि बहुजन समाजाने नुकताच दि बा पाटील यांच्या विमानतळाला नाव देण्याचा लढा पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवत उभारला आहे.  त्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या या परिसरात गेल्या काही दिवसांत विस्तारत असलेल्या राजकारणाला शह देण्याचा हेतू देखील आहे. त्यामुळे या समाजाचा विश्वास संपादन करत, शिवसेनेला असलेल्या विरोधाचा नेमका फायदा घेण्याचा भाजपचा यशस्वी प्रयत्न म्हणून या मंत्रिपदाच्या नेमणूकीला महत्वाचे मानले जात आहे. या भागातील बहुसंख्य विधानसभा मतदारसंघावर त्याचा परिणाम होणार आहे.

     स्थानिक अस्मितेवर फुंकर
    येणाऱ्या निवडणुकीचा विचार केल्यास कपिल पाटील हे ओबीसी,बहुजन, आगरी समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे, ते ज्या लोकसभा क्षेत्रात आहेत त्याभागात आगरी,कोळी, कुणबीआणि बहुजन समाज मोठ्या प्रमाणात आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यात सेनेच्या असणाऱ्या वर्चस्वाला शह देण्याची भाजपाची खेळी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्याने येणाऱ्या महापालिका आणि पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीवर नक्कीच परिणाम होणार आहे.द्यावे.