प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

सामान्य जनतेच्या भावनांच्या उद्रेकाला वाट मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने मोदींची जाहिरात असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक पेट्रोलपंपावर रविवारी २८ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता 'चूल मांडा' आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

    मुंबई (Mumbai).  सामान्य जनतेच्या भावनांच्या उद्रेकाला वाट मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने मोदींची जाहिरात असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक पेट्रोलपंपावर रविवारी २८ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता ‘चूल मांडा’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. दिवसेंदिवस गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचे भाव गगनाला भिडत असतानाच नरेंद्र मोदींची प्रत्येक पेट्रोलपंपावरील जाहिरात ही सामान्यांना अच्छे दिनचा खोटा आशावाद देत आहे, असा थेट आरोप रुपाली चाकणकर यांनी केला आहे.

    ज्या पेट्रोलपंपावर मोदींचा बॅनर किंवा जाहिरात झळकत आहे, त्या बॅनर किंवा फलकाखाली दगडाची किंवा विटांची चूल ठेवली जाईल आणि गॅस सिलेंडरच्या वाढत्या किंमतीच्या निषेधार्थ स्वयंपाकासाठी आता ही दगडाची आणि विटाची चूल पेटवण्याशिवाय पर्याय राहिला नाही याचा प्रतिकात्मक निषेध यातून करण्यात येईल असेही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.

    आंदोलनात महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर या पुण्यातून सहभागी होणार आहेत. तरी या आंदोलनात अधिकाधिक महिला कार्यकर्त्या तसेच सर्वसामान्य गृहिणींनी सोशल डिस्टन्ससिंगचे नियम पाळून सहभागी होणार आहेत असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे.