प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार महाविद्यालये सुरू झाल्यानंतर ९० दिवसांनी परीक्षा बंधनकारक आहे; मात्र मुंबई विद्यापीठाने या नियमालाच हरताळ फासली आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत असलेल्या महाविद्यालयांमध्ये नुकतेच पदव्युत्तर पदवीचे प्रवेश पार पडले, तर काही महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तर विद्यापीठाने १० मार्चपूर्वी प्रथम वर्षाच्या प्रथम सत्र परीक्षा पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • युजीसीच्या नियमांनाही हरताळ

मुंबई (Mumbai). विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार महाविद्यालये सुरू झाल्यानंतर ९० दिवसांनी परीक्षा बंधनकारक आहे; मात्र मुंबई विद्यापीठाने या नियमालाच हरताळ फासली आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत असलेल्या महाविद्यालयांमध्ये नुकतेच पदव्युत्तर पदवीचे प्रवेश पार पडले, तर काही महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तर विद्यापीठाने १० मार्चपूर्वी प्रथम वर्षाच्या प्रथम सत्र परीक्षा पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या परीक्षा कशा घ्याव्यात असा प्रश्न महाविद्यालयांसमोर निर्माण झाला आहे. कारण, वर्षभर अभ्यासक्रम शिकविलाच नाही; मग् विद्यार्थी परीक्षेत लिहणार तरी काय? असा प्रश्न विद्यार्थ्यांना सतावतो आहे.

विद्यार्थ्याना अभ्यासक्रम शिकवणे शक्य नसल्याने ही परीक्षा पुढे न्यावी अशी मागणी विद्यार्थी व प्राध्यापक संघटनांकडून होत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे अंतिम वर्षाचे निकाल, प्रवेश प्रक्रिया, पहिल्या सत्राची परीक्षा सर्वच प्रक्रिया लांबणीवर गेली. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये जेमतेम ५ ते ६ आठवड्यांपूर्वीच प्रथम वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू झाले आहेत. साधारण जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून कला (एमए), विज्ञान (एमएससी), वाणिज्य (एम.कॉम) अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या अध्यापनाला सुरूवात झाली. अद्यापही अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत आहेत. मात्र, तरीही विद्यापीठाने १० मार्चपूर्वी परीक्षा संपवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार किमान १ तारखेपासून परीक्षा सुरू कराव्या लागतील. त्यामुळे राहिलेल्या चार-पाच दिवसांत अभ्यासक्रम उरकून विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्याव्यात असा प्रश्न प्राध्यापकांनी विचारला आहे.

यातच अद्याप महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली नसल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची प्रात्यक्षिके पार पडलेली नाहीत. माहिती तंत्रज्ञान, कम्प्युटर अशा विषयांची प्रात्यक्षिकेही पूर्ण झालेली नाहीत. प्रात्यक्षिके नाहीत, तासिकाही पुरेशा झालेल्या नाहीत असे असताना परीक्षा कोणत्या आधारे घ्यायच्या. झालेल्या अभ्यासक्रमावर परीक्षा उरकणे हे विद्यार्थ्यांचे नुकसान करणारे असेल असे मत प्राध्यापक व्यक्त करत आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार किमान ९० दिवस अध्यापन कालावधी मिळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे नियमानुसार विद्यार्थ्यांना किमान महिनाभर आधी परीक्षेची पूर्वकल्पना देणे अपेक्षित आहे. मात्र, या नियमांचा विचारच विद्यापीठाने केलेला नाही. गेल्या सत्रातही विद्यापीठाने परीक्षा घेण्याची घाई केली होती. यामुळे केवळ वेळेत परीक्षा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाने परीक्षा घाई करू नये असे मतही प्राध्यापक नोंदवत आहेत.