जोपर्यंत मराठा समाज मागासवर्गीय होत नाही, तोपर्यंत ते ओबीसीत येऊ शकत नाही : ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे

महाराज स्वत:ला बहुजनांचे नेते म्हणवून घेतात. पण मग बहुजनांचं नेतृत्व करताना त्यांना ओबीसींचा विसर कसा पडतो? महाराज केवळ मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करतात. धनगर आरक्षणावर कधी बोलणार?, असे सवाल करतानाच बहुजनांचे नेते म्हणवून घेत असाल तर महाराजांनी पदोन्नतीतील आरक्षणावर बोलावं, असं आवाहन शेंडगे यांनी केलं.

    मुंबई:  मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसीत नवा प्रवर्ग तयार करण्याच्या शक्यतेविषयी भाजपचे खासदार संभाजी छत्रपती यांनी सुतोवाच केलं होतं. ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. मराठा समाज मागासवर्गीय होत नाही, तोपर्यंत ते ओबीसीत येऊच शकत नाहीत. असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे.

    राजेंचं ‘ते’ वक्तव्य संशयास्पद

    महाराजांनी अभ्यास करून विषय मांडले आहेत. पण मराठ्यांना ओबीसीत घ्यावं की घेऊ नये याबाबतचं त्यांचं वक्तव्य संशयास्पद आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्याचा कधीच निर्णय घेतला आहे. मग तरीही समाजात संभ्रम निर्माण का केला जात आहे? महाराजांनी ही भूमिका बदलली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.