…तोपर्यंत लॉकडाऊन हटवणे धोकादायक; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

  मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉकचा निर्णय घेतला असला तरी याबाबत मात्र मतैक्यच नसल्याचे दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झाला नाही. त्यातच आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या लाटेचा लहान मुलांना आणि त्याचबरोबर युवकांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री असलम शेख यांनी लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत. तर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निर्बंध पूर्णपणे उठविले जातील या भ्रमात न राहण्याचा इशारा दिला आहे.

  महाराष्ट्रामध्ये 50 टक्के कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण होत नाही, तोपर्यंत लॉकडाऊन हटवणे धोकादायक आहे. येणाऱ्या दिवसात सर्व बाबी तपासून दुकानांसंदर्भामध्ये काही शिथिलता देता येईल का? याबाबत टास्क फोर्समध्ये निर्णय घेण्यात येईल असे मुंबईचे पालकमंत्री असलम शेख म्हणाले.

  जर सर्व गोष्टी सकारात्मक असतील तरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी चर्चा करत निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्याचा विचार करू शकतात. निर्बंध पूर्णपणे उठवले जातील या भ्रमात राहू नका असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला.

  सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीहा गाफील राहू नये राज्यात 31 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे. परिस्थितीचा आढावा घेऊनच लॉकडाउनसंदर्भात निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाउन सरसकट उठवणे अडचणीचे ठरेल. निर्बंध शिथील करण्यासंबंधी मुख्यमंत्री 31 मे च्या आधी निर्णय घेतील असे  राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगीतले.

  अनलॉकबाबत साशंकता

  सध्या दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत असल्याने लॉकडाउन शिथील करण्याची मागणी होत आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता ठाकरे सरकार लॉकडाउन उठवणार की नाही याबाबत साशंकता आहे. राज्यातील 15 जिल्हे असे आहेत जिथे पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. काही जिल्ह्यात तीन ते पाच टक्के प्रमाण आहे.

  मुभा देण्यावर विचार

  लॉकडाउनमघ्ये कोणते बदल करायचे, कोणती दुकानं उघडायची, एसीची दुकानं, सलून, इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांना निर्बंधांतून वगळता येईल का? अत्यावश्यक सेवा म्हणून परवानगी असणाऱ्या सेवांमध्ये अजून वाढ करता येईल का? याची चाचपणी सुरू असल्याची माहिती शेख यांनी दिली.