फाटलेली जीन्स युवा सांभाळतील पण फाटक्या अर्थव्यवस्थेचं काय ? उर्मिला मातोंडकर यांनी लगावला भाजपला टोला

तीरथ सिंह रावत(teerath singh rawat) यांनी महिलांच्या कपड्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. उर्मिला मातोंडकर(urmila matondkar reaction) यांनीदेखील ट्विटरवर या मुद्द्यावरुन भाजपला टोला लगावला आहे.

    मुंबई: फाटलेली जीन्स (torn jeans)राज्यातील कर्तबगार युवा सांभाळतील. पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचे काय ? त्याचे उत्तर द्या, असा खोचक टोला शिवसेनेच्या महिला नेत्या आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ट्विटरवर लगावला आहे. उर्मिला यांच्यासह अनेक दिग्गज महिलांनी ट्विटरवर उत्तराखंडचे भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना फटकारले आहे. तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या कपड्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेक लोकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. उर्मिला मातोंडकर यांनीदेखील ट्विटरवर या मुद्द्यावरुन भाजपला टोला लगावला आहे.

    तीरथ सिंह रावत यांनी देहरादून येथील एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांची जीभ चांगलीच घसरली. मी एकदा जयपूरहून येत होतो. तेव्हा काही सहकारी माझ्यासोबत होते. दुसर्‍या दिवशी करवाचौथचा सण होता. आम्ही विमानात बसलो तेव्हा माझ्या बाजूला एक महिला बसली होती. मी तिच्याकडे पाहिले तेव्हा खाली गमबूट, आणखी वर बघितले तर तिच्या गुडघ्यावरची जीन्स फाटली होती, हात बघितले तर त्यामध्ये कडेच-कडे, असा तिचा एकूण अवतार होता, असे रावत म्हणाले होते. मी तिची विचारपूस केली तेव्हा तिने दिल्लीला जात असल्याचे सांगितले. मी स्वयंसेवी संस्था चालवते असे तिने सांगितले. मात्र, गुडघ्यावर फाटलेली जीन्स घालून ती एनजीओ चालवते, समाजात जाते, सोबत लहान मुले आहेत, या सगळ्यातून काय संस्कार होणार?, असा सवाल तीरथ सिंह रावत यांनी उपस्थित केला होता. त्याचा समाचार मातोंडकर यांनी घेतला आहे.

    फाटलेली जीन्स घालणे म्हणजे हल्ली स्टेटस सिम्बॉल

    सध्याच्या काळात फाटलेली जीन्स म्हणजे स्टेटस सिम्बॉल समजले जाते. व्यक्ती जितकी फाटलेली जीन्स घालेल तितकी ती श्रीमंत असे समजले जाते. या सगळ्यातून आपण समाजाला आणि आपल्या लहान मुलांना काय शिकवत आहोत? संस्कारांची सुरुवात ही घरातून होते. आपण जसं वागतो, त्याचेच लहान मुले अनुकरण करतात. त्यामुळे लहान मुलांना घरातूनच चांगले संस्कार मिळाले पाहिजेत. आपण कितीही पुढारलेलो असलो तरी चांगले संस्कार मिळणे गरजेचे असते. त्यामुळे आपण आयुष्यात कधीही अपयशी ठरणार नाही, असेही तीरथ सिंह रावत यांनी म्हटले होते.

    अनेक अभिनेत्रींची मुख्यमंत्र्यांवर टीका

    अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा, अभिनेत्री गुल पनाग यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर फटकारले आहे. आमचे कपडे बदलण्याआधी स्वत:ची मानसिकता बदला, अशा शब्दात नव्या नवेली नंदाने इन्स्टाग्राम स्टेटसवर फटकारले आहे. याशिवाय ट्विटरवर अनेक युजर्सनी रावत यांच्यावर टीका केली आहे.