उर्मिला मातोंडकर झाल्या पक्क्या शिवसैनिक; मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला दिला उत्तम प्रतिसाद

मुंबई : जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी केले होते. शिवसेनेचा झेंडा हाती धरलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी देखील रक्तदान मोहिमेत सहभाग घेत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

मुंबईतील कूपर रुग्णालयात उर्मिला मातोंडकर यांनी रक्तदान केले. मुख्यमंत्र्यानी राज्यात रक्ताची टंचाई असल्याचे सांगत जनतेला स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांचे हे आवाहन नक्कीच गरजुंना उपयुक्त ठरणार आहे अशी प्रतिक्रिया मातोंडकर यांनी यावेळी दिली. तसेच त्यांनी या रक्तदान मोहिमेत सहभागी झाल्याचे फोटोही ट्विटरवर शेअर केले आहेत.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोना संकट काळात खूप चांगल्या पद्धतीने सांभाळले. ते सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत. आपुलकीने सर्वांशी बोलत आहेत. घरातील कुटुंबप्रमुखाप्रमाणे ते सर्वांना समजवतात. त्यांनी ज्याप्रकारे महाराष्ट्राला सांभाळले त्याने मी प्रभावित झाली आहे. अशा नेतृत्वासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे”, अशी प्रतिक्रिया उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिली होती.

राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या कोट्यातून विधान परिषदेवरील शिवसेना उमेदवार असलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी एक डिसेंबरला ‘मातोश्री’वर शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. मुख्यमंत्र्याच्या पत्नी रश्मी ठाकरे  यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधले.