डबल मास्क आणि फेस शिल्ड वापरा; मुंबई पोलीस आयुक्तांनी दिले आदेश

  मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. दरम्यान यामुले आता डबल मास्क लावण्याची वेळ आली आहे. तशा सूचना मुंबई महापालिकेन दिल्यानंतर, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. मुंबई पोलिसांना फेस शिल्ड आणि डबल मास्क घालण्याचे आदेश, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिले आहेत.

  दरम्यान मुंबईत करोनाचे रुग्ण सतत वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांना सतत बंदोबस्त करावा लागत आहे. मुंबई पोलीस सतत रस्त्यावर , लोकांमध्ये असतात. याचा परिणाम पोलीस दलातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलाव होत आहे. आतापर्यंत 100 पेक्षा जास्त पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांची संख्याही मोठी आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी महत्वाचे आदेश काढले आहेत. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी फेस शिल्ड घालावी. त्याचमाणे डबल मास्क घालावेत असे आदेश देण्यात आले आहेत.

  डबल मास्कविषयी माहिती

  तुम्ही वापरत असलेला डबल मास्क तुमच्या चेहऱ्यावर व्यवस्थित आहे की नाही याची काळजी घ्या. जर तो योग्यरित्या बसत नसेल तर तो कोरोनाचे विषाणू सहज तुमच्या शरीरात शिरकाव करु शकतात, त्यामुळे ते धोकादायक ठरते. दोन मास्क घातल्याने तुमचा कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव होऊ शकतो.

  डबल मास्क कसा घालावा?

  अमेरिकेतील रोग आणि नियंत्रण प्रतिबंधक केंद्र (सीडीसी) यांच्या अभ्यासानुसार, दोन मास्क घालणं हे फार प्रभावी मानले जाते. पण दोन मास्क व्यवस्थितरित्या लावल्यास तुम्ही कोरोनापासून स्वत:चा बचाव करु शकता. दरम्यान देशात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. केंद्र सरकारने तर कोरोनाची ही दुसरी लाट अत्यंत भयंकर असून आता घरातही मास्क लावण्याची वेळ आल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं स्पष्ट होत आहे.