४५ वर्षांपुढील लाभार्थींचे लसीकरण ठप्प; केंद्राकडून साठाच उपलब्ध नाही

    मुंबई : केंद्र सरकारकडून ४५ वर्षांवरील लाभार्थींना देण्यात येणारा लसीचा डोस अद्यापही राज्याला मिळालेला नाही. त्यामुळे सोमवारीही मुंबईत ४५ हून अधिक वय असणाऱ्यांचे लसीकरण होणार नाही. मुंबईत गेल्या तीन दिवसांत लस नसल्यामुळे लसीकरण ठप्प पडले आहे. रविवारपर्यंत केंद्राकडून राज्याला लसीची खेप मिळण्याची आशा होती, परंतु, लस न मिळाल्यामुळे लसीकरणासाठी केवळ पाच केंद्र सुरु राहणार आहेत. येथे १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना लसीचा डोस देण्यात येणार आहे.

    सध्या सर्व वयोगटातील नागरिक लसीकरण केंद्रावर मोठ्या स्वरूपात गर्दी करत आहेत, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर आणि लसीकरण केंद्रावर येऊ नये. पालिका प्रशासनाकडून लस उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून लसीचा साठा प्राप्त होताच नागरिकांना कळविण्यात येणार आहे. यास्तव नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊन गर्दी करू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    रविवारी पालिकेच्या नायर, बीकेसी जम्बो काेविड केअर सेंटर, राजावाडी, कूपर, सेव्हन हिल्समध्ये २३२७ तरुण आणि ४४ वर्षांपर्यंतच्या लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले. गेल्या दोन दिवसांत ३४१९ जणांना लस देण्यात आली. मुंबईत एकूण २४ लाख ५६ हजार ६७२ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.