मुंबईतील २५ खासगी रुग्णालयात लसीकरण थांबले, उर्वरित केंद्रांमध्ये उद्या पुरेल इतका लससाठा शिल्लक

    मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड – १९ प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी मान्यता मिळालेल्या ७१ पैकी २५ खासगी रुग्णालयात लससाठा संपल्याने या २५ लसीकरण केंद्रांवर आज (दिनांक ८ एप्रिल, २०२१) लसीकरण झाले नाही. उर्वरित केंद्रांवर सध्या लसीकरण सुरु असून तेथेही उद्या पुरेल इतका लससाठा शिल्लक आहे. लससाठा उपलब्ध होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.

    दरम्यांन बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड – १९ लसीकरण मोहिमेंतर्गत महानगरपालिका आणि शासन यांच्यातर्फे ४९ कोविड लसीकरण केंद्रे तसेच ७१ खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात या सर्व केंद्रांवर मिळून प्रतिदिन सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. महानगरपालिकेला दिनांक ७ एप्रिल २०२१ पर्यंत एकूण १७ लाख ०९ हजार ५५० इतक्या लसी उपलब्ध झाल्या. पैकी, १५ लाख ६१ हजार ४२० लस उपयोगात आल्या. म्हणजेच १ लाख ४८ हजार १३० इतका लससाठा काल (दिनांक ७ एप्रिल २०२१) लसीकरणानंतर शिल्लक होता.

    दरम्यांन शिल्लक साठ्यातील ४४ हजार ८१० इतक्या लस दुसऱया मात्रेसाठी (सेकंड डोस) राज्य शासनाच्या निर्देशानुसार राखीव आहे. म्हणजेच एकूण १ लाख ०३ हजार ३२० इतक्या आज (दिनांक ८ एप्रिल २०२१) सकाळी उपलब्ध होत्या. आज (दिनांक ८ एप्रिल २०२१) चे सुमारे ४० ते ५० हजार लसीकरण पूर्ण झाल्यानंतर उद्या (दिनांक ९ एप्रिल २०२१) पुरेल इतका लससाठा उपलब्ध असेल. लसीकरण मोहीम सातत्याने सुरु ठेवता यावी, म्हणून लससाठा उपलब्ध व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून पाठपुरावा सातत्याने सुरु आहे.