खासगी रुग्णालयात लसींचे दर भिन्न -भिन्न; नागरिकांमध्ये नाराजी

प्रत्येक रुग्णालय लसीची किंमत स्वत: च्या मर्जीनुसार ठरवत असून लाभार्थ्यांचा अधिकचा सेवा शुल्कही आकारत आहे. गंभीर बाब म्हणजे 1 मेपूर्वी या रुग्णालयांमध्ये डोस मिळण्यासाठी सेवा शुल्क प्रति डोस केवळ 100 रुपये होते, परंतु आता ही रक्कम देखील वाढली आहे. बहुतेक रुग्णालये लस देण्यासाठी किमान सेवा शुल्क 150 ते 200 रुपये आकारत आहेत.

  मुंबई : खासगी क्षेत्रात होणाऱ्या लसीकरणाबाबत व संबधित यंत्रणेबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे, असे असताना, शहरातील खासगी रुग्णालयात एकाच प्रकारच्या लसीसाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्याचे समोर येत आहे.

  प्रत्येक रुग्णालय लसीची किंमत स्वत: च्या मर्जीनुसार ठरवत असून लाभार्थ्यांचा अधिकचा सेवा शुल्कही आकारत आहे. गंभीर बाब म्हणजे 1 मेपूर्वी या रुग्णालयांमध्ये डोस मिळण्यासाठी सेवा शुल्क प्रति डोस केवळ 100 रुपये होते, परंतु आता ही रक्कम देखील वाढली आहे. बहुतेक रुग्णालये लस देण्यासाठी किमान सेवा शुल्क 150 ते 200 रुपये आकारत आहेत.

  लसीच्या कमतरतेमुळे महापालिकेला वेळोवेळी लसीकरणाचे नियम बदलावे लागत आहेत. तर, खासगी लसीकरण केंद्रात लाभार्थी लसीसाठी अधिकचे पैसे देऊन कोरोनापासून स्वतःचे रक्षण करत आहेत.

  लसीच्या कमतरतेमुळे मुंबईसह महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबले आहे. मात्र, याच वयोगटातील लोकांना खासगी लसीकरण केंद्रांवर लस दिली जाते. या केंद्रांमध्ये लसीची कमतरता नाही किंवा लाभार्थ्यांना जास्त वेळ वाटही पाहावी लागत नाही. तर शासकीय केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने बहुतांश लाभार्थ्यांना वाट पाहावी लागत आहे.

  कोविशिल्डचा एक डोस खासगी लसीकरण केंद्रांवर कमीतकमी 800 ते 850 रुपये आणि खासगी रुग्णालयात, गृहनिर्माण संस्थांमध्ये एक हजार रुपयांना देण्यात येतो. तर, कोव्हॅक्सिन लसीसाठी केंद्रावर 1250 आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये 1450 रुपये द्यावे लागतात.

  देखभाल, लॉजिस्टिक आणि स्टाफचा खर्च

  मुंबईतील प्रमुख खासगी लसीकरण केंद्रांनी देखभाल, लॉजिस्टिक आणि कर्मचाऱ्यांचा खर्च हे जास्त दराने लस देण्याचे कारण सांगितले आहे. एका केंद्राच्या प्रवक्त्यांनी सांगितले की  साठवणुकीवरील खर्च, लसीसाठी ठेवलेले कर्मचारी, लस आणण्यासाठी लागणारा खर्च आणि लसीकरणाची स्वतंत्र व्यवस्था यामुळे लसीची किंमत वाढवावी लागली आहे.

  अपोलो रुग्णालयमध्ये कोविशिल्ड 850 रुपये, कोव्हॅक्सिन 1250 रुपये

  प्रमुख लसीकरण केंद्रांपैकी अपोलो रुग्णालयात कोविशिल्ड लसीसाठी 800 रुपये आणि कोव्हॅक्सिन  लसीसाठी 1250 रुपये आकारले जात आहेत. अपोलो रुग्णालयांच्या प्रवक्त्यांच्या म्हणण्यानुसार, हाच दर केंद्रांसाठी निश्चित करण्यात आला आहे तर गृहनिर्माण संस्थांमधील लसीकरण शिबिरासाठी 200 रुपये अधिक आकारले जातात. या जास्तीच्या किंमतीचे कारण म्हणजे लसीकरण आणि लसीच्या कोल्ड स्टोरेजची व्यवस्था हे आहे.

  फोर्टिसमध्ये कोविशिल्ड 800 रुपयांना

  मुंबईतील इतर प्रमुख खासगी लसीकरण केंद्रांमध्ये कोविशिल्डच्या डोससाठी 800 रुपये आणि कोव्हॅक्सिन लसीसाठी 1250 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. फोर्टिस रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, सोसायटीच्या आवारात लसीकरणासाठी कोविशिल्डच्या एका डोससाठी 1000 रुपये आणि कोव्हॅक्सिन लसीसाठी 1,450 रुपये आकारले जात आहेत. प्रवक्त्यांनी या अधिक किंमतीसाठी जीएसटी व्यतिरिक्त लसीची सुविधा आणि स्टोरेजसाठी लागणारा खर्च सांगितला आहे.

  बॉम्बे रूग्णालयात कोव्हशिल्डसाठी 800 रुपये

  बॉम्बे रूग्णालयात कोविशिल्ड लसीसाठी लाभार्थ्यांना 800 रुपये द्यावे लागतात. सध्या कोविशिल्ड लस लाभार्थ्यांना दिली जात आहेत. लसीकरण केंद्राचे प्रमुख डॉ. गौतम भन्साळी यांनी साांगितले  की, लस शुल्कावरील जीएसटी आणि लॉजिस्टिक खर्च लक्षात घेऊन रुग्णालयाला लसीचा खर्च 750 ते 780 रुपयांपर्यंत पडतो. सामाजिक उपक्रम असल्याने रूग्णालय प्रशासन ना नफा ना तोटा या धोरणावर लोकांना लस देत आहे.

  हे सुद्धा वाचा