वडेट्टीवार साहेब तुमच्या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात जावं लागेल, मनसेच्या नेत्याची उपरोधिक टीका

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या सावळ्या गोंधळावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे. ‘वडेट्टीवार साहेब तुमच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जायला लागू शकतं. काही कळतं की नाही तुम्हाला वा…,’ असं उपरोधिक भाष्य संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

    मुंबई : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १८ जिल्ह्यांतील लॉकडाऊन पूर्णपणे हटवण्याची घोषणा माध्यमांद्वारे केली. ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि एकूण ऑक्सिजन बेड्स फक्त २५ टक्के व्यापलेले असतील तिथे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अगदी थिएटर्स पासून ते सार्वजनिक वाहतूक पूर्ण क्षमतेने तेही उद्यापासूनच सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते.

    यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, आता याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसून याबाबत स्थानिक स्तरावर आढावा घेतल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच, हा निर्णय अद्याप विचाराधीन असल्याचं माहिती व जनसंपर्क खात्याकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे आधी घोषणेची घाई नंतर निर्णय मागे घेतल्याची घाई. यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

    या गोंधळावर भाजप पाठोपाठ मनसेने देखील टीका केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या सावळ्या गोंधळावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील टोला लगावला आहे. ‘वडेट्टीवार साहेब तुमच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना रोज मंत्रालयात जायला लागू शकतं. काही कळतं की नाही तुम्हाला वा…,’ असं उपरोधिक भाष्य संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

    वडेट्टीवारांनी दिलं अजब स्पष्टीकरण

    ‘एकूण ४३ भाग करण्यात आले आहेत. यात जिल्ह्यासह १० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या महापालिका यांचा समावेश आहे. यात पॉझिटिव्हिटी रेट व व्यापलेले ऑक्सिजन बेड्स याच्या आधारावर पाच स्तर निर्माण करण्यात आले आहेत. याला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री याबाबत अधिकृत घोषणा करतील. मी संबंधित खात्याचा मंत्री म्हणून बैठकीनंतर माहिती दिली. मात्र, तत्वतः हा शब्द राहिला असेल,’ असं अजब स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे.