तब्बल 2062 जागांसाठी शिक्षक भरती, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

राज्यातील शिक्षण विभागात एकूण 2062 जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होत आहे. यात शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस केली आहे. अशी माहिती, राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

  मुंबई : राज्यातील शिक्षण विभागात एकूण 2062 जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होत आहे. यात शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस केली आहे. अशी माहिती, राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

  वर्षा गायकवाड नेमकं काय म्हणाल्या?

  वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “पवित्र पोर्टलच्या माध्यमातून 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदांसाठी 15123 पसंतीक्रमावर 3902 उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा!”
  पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती सरळसेवेनं करा, डी.एड. बी.एड. धारक आदिवासी विद्यार्थ्यांचं आमरण उपोषण

  दरम्यान, आदिवासी समाजातील डी.एड, बीएड धारक विद्यार्थ्यांनी शिक्षक भरतीसाठी 23 ऑगस्टला पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं होतं. पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या 1662 रिक्त जागा सरळसेवा शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं.

  तसेचं पालघर जिल्ह्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षकांच्या 1662 रिक्त जागा सरळसेवा शिक्षक भरती प्रक्रियेद्वारे भराव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. वारंवार पत्रव्यवहार, निवेदने, आंदोलने करून सुद्धा त्याची दखल न घेतल्यामुळे आदिवासी डीटीएड, बीएड कृती समितीच्या नेतृत्वात आंदोलन सुरु करण्यात आलं. जिल्ह्यातील आदिवासी समाजातील डीटीएड, बीएड धारक विद्यार्थ्यांनी पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. उपोषणात मोठ्या संख्येने विद्यार्थिनींचा सहभाग होता.

  शिक्षकांच्या 6100 जागा भरण्यास मंजुरी

  शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 8 जुलै रोजी राज्यातील सुमारे 6 हजार 100 शिक्षण सेवकांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसलूमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भरती प्रक्रियेला सध्या लागू असलेल्या पदभरती बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली होती.

  राज्य सरकारच्या त्यानिर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित,अंशतः अनुदानित व विनाअनुदानित, अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक,उच्च प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांतील,शासकीय व अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी.एल.एड.कॉलेज) शिक्षकांची सुमारे 6100 रिक्त पदं भरली जातील.

  शिक्षकांची 40 हजार पदे रिक्त

  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात 6100 जागा भरण्यात येणार आहेत.