हिरेन यांच्या हत्येच्या कट-कारस्थान बैठकीला वाझे उपस्थित, विशेष एनआयए न्यायालयात एनआयएचा दावा

तपास करताना कागदाचा तुकडा सापडला असून त्यात १४ मोबाइल फोन नंबर आहेत, त्यातील पाच फोन नंबर वाझे यांना देण्यात आले होते. तसेच एक मोबाईल फोनही वाझे यांना देण्यात आला होता, ज्याचा वापर हिरेन यांना ठार मारण्याच्या कट रचणार्‍याशी संपर्क साधण्यासाठी वाझे यांना केला होता, त्यामुळे हिरेन यांच्या हत्ये मागील कारस्थान आणि हेतू उलगडण्याच्या तपास यंत्रणाजवळ असल्याची माहिती गोंसालवेस यांनी न्यायालयाला दिली.

     

    मुंबई : ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येची योजना आखण्यात आली. त्या बैठकीला निलंबित मुंबई पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि माजी पोलिस विनायक शिंदे उपस्थित होते. असा दावा मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) वतीने विशेष एनआयए न्यायालयात करण्यात आला. तसेच वाझे यांनी या कारस्थान रचणाऱ्या मुख्य सूत्रधाराला मोबाईलवरून फोन केला असल्याचीही माहिती एनआयएने न्यायालयाला दिली. त्यामुळे हे कारस्थान आणि गुन्ह्यामागील हेतू जवळपास उलगडला असल्याचेही एनआयएने न्यायालयाला सांगितले.

    अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आल्याच्या तसेच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासह माजी पोलिस विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर यांना अटक करण्यात आली होती. मागील आठवड्यातच शिंदे आणि गोर यांचा ताबा एनआयएला देण्यात आला.

    मंगळवारी त्यांची कोठडी संपत असल्याने त्यांना विशेष एनआयए न्यायालयाचे न्या. प्रशांत. रा. सित्रे यांच्यासमोर हजर करण्यात आले. हिरेन यांच्या हत्येचे कारस्थान रचलं त्या ठिकाणी वाझे आणि शिंदे उपस्थित होते. तसेच सात सिमकार्ड, काही मोबाईल आणि सीपीयू जप्त करण्यात आले आहेत. त्यातील सिम कार्ड आणि मोबाइल फोन शिंदे यांच्याकडून जप्त करण्यात आल्यामुळे त्याबाबत आरोपींकडे चौकशी करणे आवश्यक असल्याचे एनआयएकडून विशेष सरकारी वकील सुनील गोंसलवेस यांनी न्यायालयात सांगितले. तसेच तपास करताना कागदाचा तुकडा सापडला असून त्यात १४ मोबाइल फोन नंबर आहेत, त्यातील पाच फोन नंबर वाझे यांना देण्यात आले होते. तसेच एक मोबाईल फोनही वाझे यांना देण्यात आला होता, ज्याचा वापर हिरेन यांना ठार मारण्याच्या कट रचणार्‍याशी संपर्क साधण्यासाठी वाझे यांना केला होता, त्यामुळे हिरेन यांच्या हत्ये मागील कारस्थान आणि हेतू उलगडण्याच्या तपास यंत्रणाजवळ असल्याची माहिती गोंसालवेस यांनी न्यायालयाला दिली.

    सिमकार्ड वितरणाशिवाय शिंदे यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही, तसेच त्यांना या आधीच नऊ दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या अधिक कोठडीची गरज नसल्याचा दावा आरोपी शिंदे आणि गोर यांच्यावतीने कऱण्यात आला. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने शिंदे आणि गोर यांच्या कोठडीत ७ एप्रिलपर्यंत वाढ केली