Viral Video : पावसात जलसमाधी घेतलेल्या ‘त्या’ कारच्या बदल्यात मालकाला घरपोच मिळाली नवी कोरी कार

नवी कोरी कार मिळाल्यानंतर किरण दोषी म्हणाले की, 'कार पाण्यात बुडाल्यानंतर बजाज अलाएन्सचे कर्मचारी माझ्या घरी आले. त्यांनी माझ्याकडून काही फॉर्म भरुन घेतले. त्यानंतर त्यांनी मला कोणत्या कार डिलरकडून कार घेणार हे कळवण्यास सांगितलं. त्या कार डिलरला कंपनीच्या वतीने कार पुरवण्यात आल्याचं दोषी सांगतात.

    मुंबई : गेल्या महिन्यात पहिल्याच पावसाने मुंबईला (Mumbai) झोडपून काढलं होतं. अशातच घाटकोपरमध्ये (ghatkopar) एका सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये अचानक खड्डा पडला आणि कार पाण्यात बुडाली होती. हा व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला होता. या घटनेवर बरेच मिम्स आणि जोक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान कार मालकाला बजाज अलायन्सनं नवी कोरी कार भेट दिली आहे.

    डॉ. किरण दोषी असं या कार मालकाचं नाव आहे. यासंबंधी एक जाहिरातही कंपनीनं केली आहे. नवी कोरी कार मिळाल्यानंतर किरण दोषी म्हणाले की, ‘कार पाण्यात बुडाल्यानंतर बजाज अलाएन्सचे कर्मचारी माझ्या घरी आले. त्यांनी माझ्याकडून काही फॉर्म भरुन घेतले. त्यानंतर त्यांनी मला कोणत्या कार डिलरकडून कार घेणार हे कळवण्यास सांगितलं. त्या कार डिलरला कंपनीच्या वतीने कार पुरवण्यात आल्याचं दोषी सांगतात.

    अशी घडली होती घटना

    घाटकोपरच्या राम निवास इमारतीच्या आवारात ही घटना घडली होती. सदर सोसायटीच्या आवारात एक विहिर आहे. या विहिरीच्या अर्ध्या भागावर ‘आरसीसी’ करून ती विहीर झाकण्यात आली होती. त्या ‘आरसीसी’ केलेल्या भागावर सोसायटीतील रहिवाशी ‘कार पार्क’ करीत असत. हाच ‘आरसीसी’ चा भाग खचून त्यावर ‘पार्क’ केलेली एक कार पाण्यात बुडाली. तब्बल १२ तासानंतर या ठिकाणी ४० फूट खोल पडलेली ही कार बाहेर काढण्यास अखेर यश आलं होतं.

    पालिकेनं दिलं होतं स्पष्टीकरण

    कार पाण्यात बुडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मुंबई महानगरपालिकेकडूनही यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. मुंबई मनपाने म्हटलं, कारच्या या घटनेशी महापालिकेचा दुरान्वयानेही संबंध नाही. ही घाटकोपर भागातील खासगी सोसायटीतील घटना आहे. घाटकोपर पश्चिम परिसरातील एका खासगी सोसायटीच्या परिसरात उभी असलेली एक कार पाण्यात बुडत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे कळविण्यात आले आहे की, सदर व्हिडिओतील घटना १३ जून २०२१ रोजी सकाळी घाटकोपर पश्चिम परिसरात घडलेली आहे.

    viral video ghatkopar car sank bajaj allianz general insurance gifted new car to owner