विश्वास नांगरे पाटील यांच्या अडचणीत वाढ?; सोमय्यांच्या ‘या’ तक्रारीची मानवाधिकार आयोगाने घेतली दखल

सोमय्या यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याविरूद्ध राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली असून आयोगाने या तक्रारीची दखल घेतली आहे.

  मुंबई :  भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करताना सोमय्या दिसून येत असून अनेक मंत्री सोमय्या यांच्यामुळे अडचणीत आले आहेत. विशेषतः माजी गृहमंत्री अनिल देशमुख,हसन मुश्रीफ,अनिल परब आदी नेते सोमय्या यांच्या रडारवर आहेत.

  दरम्यान आता सोमय्या यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याविरूद्ध राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली असून आयोगाने या तक्रारीची दखल घेतली आहे.

  नेमकं काय आहे प्रकरण?

  कोल्हापूरला जाताना सोमय्या यांना रोखण्यात आले होते यावरून देखील सोमय्या चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे सोमय्या यांच्या आरोपांची मालिका सुरुच असून यावेळी कुणी राजकीय नेता नाही तर मुंबईचे पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांनी लक्ष्य केलं आहे.

  सोमय्या काय म्हणाले? 

  विश्वास नांगरे पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करत आहेत, त्यांनी मला सहा तास घरात कोंडून ठेवले होते. घोटाळेबाजांना वाचवण्यासाठी नांगरे पाटील यांनी पदाचा गैरवापर केला. अशी तक्रार किरीट सोमय्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे केली होती. घोटाळ्यांच्या प्रकरणात राज्य सरकार तपासात अडथळे निर्माण करत आहे. त्यामुळे आम्हाला केंद्राकडे जावे लागते. हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणात त्यांच्यावर मुंबई पोलीसांनी केलेल्या कारवाईबाबत बोलाताना किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे ठाकरे सरकारचा माफिया म्हणून काम करत आहेत हे लक्षात घ्यावं. विश्वास नांगरे पाटलांनी मला तर बेकायदेशीर रित्या घरात कोंडून ठेवलं. तेच सूचना देत होते, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

  याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणले, किरीट सोमय्या यांची तक्रार माझ्याकडे अद्याप आलेली नाही, ती इतर सदस्याकडे गेली असेल. शासकीय पदाचा गैरवापर केल्याची तक्रार असल्याने महाराष्ट्र सरकारला याप्रकरणी काय कारवाई झाली याबाबत अहवाल मागितला जाईल. असे मुळे म्हणाले.