महाविकास आघाडीच्या अपयशी कारकीर्दीचे उत्तर मतदारांनी मतदानातून दिले; विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर

गेल्या दीड वर्षांत महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. दीड वर्षांमध्ये महाविकास आघाडी( Mahavikas Aghadi) सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी काहीही करू शकले नाही, त्याचे उत्तर मतदारांनी मतदानातून दिले आहे. अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी दिली.

    मुंबई : गेल्या दीड वर्षांत महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. दीड वर्षांमध्ये महाविकास आघाडी( Mahavikas Aghadi) सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी काहीही करू शकले नाही, त्याचे उत्तर मतदारांनी मतदानातून दिले आहे. अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर(Pravin Darekar) यांनी दिली.

    दरेकर म्हणाले की, राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः यवतमाळ, वाशिम, हिंगोली, उस्मानाबाद आदी अतिवृष्टी भागाचा दौरा केला. त्यावेळी शेतकऱ्यांनी जो आक्रोश व्यक्त केला तो आम्ही बघितला आहे. शेतकरी ढसाढसा रडत होते. महाविकास आघाडी सरकारचे कुठल्याही प्रकारे शेतक-यांकडे लक्ष नाही.

    देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी त्या सरकारने शेतक-यांना तातडीने नुकसानभरपाई दिली होती. शेतकऱ्यांना मोठा दिलासा होता. त्याउलट महविकास आघाडी सरकारने निर्सग चक्रिवादळ, तौक्ते वादळ, या कठिण परिस्थितीत शेतकरी व पूरग्रस्तांना केवळ आश्वासन दिले व वार्‍यावर सोडले. परंतु प्रत्यक्षात काहीच मदत दिली नाही. त्याची सर्व नाराजी यंदाच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निकालामध्ये दिसल्याचे त्यांनी सांगितले.

    दीड वर्षाच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकारने समाजातील कुठल्याही घटकाला आनंद देण्याचा प्रयत्न केला नाही. महाराष्ट्र कोविडने पूर्ण त्रस्त होता. शेतकरी उध्वस्त झाला होता आणि व्यापारी, छोटे उद्योजक हेही कोविडमुळे त्रस्त होते. कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. महाराष्ट्र असुरक्षित आहे. अशा वेळी सरकारच्या संवेदना दिसत नाहीत. त्यामुळे दीड वर्षांमध्ये हे सरकार राज्यातील जनतेसाठी काहीही करू शकले नाही, हे सरकार अपयशी ठरलेले आहे. त्याचे उत्तर जनतेने निवडणुकीतून दिल्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले.