पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राजीनामा द्यावा; नवाब मलिक यांचा हल्लाबोल

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपाला पराभूत करून निवडणुकीत बहुमत मिळविले आहे. भाजपच्या पराजयावरून महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर निशाना साधला आहे.

    मुंबई (Mumbai). पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी भाजपाला पराभूत करून निवडणुकीत बहुमत मिळविले आहे. भाजपच्या पराजयावरून महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर निशाना साधला आहे. मोदी आणि शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये झालेल्या भाजपाच्या पराभवानंतर राजीनामा द्यावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

    “देशात कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झालीय त्याची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. मात्र, त्यावर अमित शहा यांनी जेव्हा जनता आम्हाला नाकारेल तेव्हाच आम्ही राजीनामा देऊ, असं म्हटलं होतं. आता बंगालच्या जनतेने त्यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे अमित शहा आणि मोदी यांनी राजीनामा द्यावा”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

    अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारात फक्त फेकाफेकीचं राजकारण केलं होतं. अबकी बार २०० पार असा प्रचार केला गेला होता. मग आता काय झालं? निवडणूक निकालाचं मोदी आणि शहा यांनी उत्तर द्यायला हवं, असंही मलिक म्हणाले.

    पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. तृणमूल काँग्रेस सध्या 209 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 81 जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमधील नंदीग्राम मतदार संघावर सर्वांचं लक्ष केंद्रीत झालं होतं. या मतदार संघातून ममता बॅनर्जी आणि तृणमूलमधून भाजपमध्ये गेलेल्या शुभेंदू अधिकारी यांनी निवडणूक लढवली होती. अटीतटीच्या लढतीत ममता बॅनर्जी यांनी ३७२७ मतांनी विजय साजरा केला आहे.