खड्ड्यांवरील टीकेनंतर पालिका प्रशासनाला जाग; रस्त्यातील खड्डे भरायला सुरूवात

मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली आहे. भाजप आणि मनसेने खड्ड्यांच्या समस्येवरून पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेला टीकेचे लक्ष केले आहे. त्यांच्या टीकेनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने रस्त्यांतील खड्डे भरण्यास सुरूवात केल्याचे आता दिसून येत आहे.

    मुंबई : मुंबईतील रस्त्यांची चाळण झाली आहे. भाजप आणि मनसेने खड्ड्यांच्या समस्येवरून पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेला टीकेचे लक्ष केले आहे. त्यांच्या टीकेनंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने रस्त्यांतील खड्डे भरण्यास सुरूवात केल्याचे आता दिसून येत आहे.

    रस्त्यात पडलेले खड्डे बुजविण्याची कार्यवाही युध्द पातळीवर सर्व प्रशासकीय विभाग कार्यालये आणि रस्ते विभाग यांनी संयुक्तपणे सुरु करावी. पालिकेच्या सहायक आयुक्त आणि रस्ते अभियंता यांनी दररोज आपापल्या हद्दीत फिरुन खड्डे भरण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर करावी, निदर्शनास आलेला खड्डा त्याच दिवशी भरावा, रस्ते अभियंत्यांना इतर अतिरिक्त कामांमधून तातडीने कार्यमुक्त करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

    खड्डयांची समस्या निकाली काढण्यासाठी पुढील २ ते ३ आठवडे प्राधान्याने कामे करावीत, असे सक्त निर्देश पालिका आयुक्त चहल यांनी दिले आहेत. त्यानुसार मुंबई शहर आणि उपनगरात रस्त्यांतील खड्डे भरण्याच्या कामाला सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षांच्या टीकेमुळे प्रशासनाला अखेर जाग आली असून पावसाची उघडीप मिळताच रस्त्यांतील खड्डे भरण्याची कामे सुरू झाल्याचे दिसून येत आहे. पालिका आयुक्तांनी गेल्या 9 एप्रिलपासून रस्त्यांतील खड्डे भरण्याची कामे सुरू असल्याचे म्हटले आहे. असे असताना रस्त्यांत खड्डे का पडत आहेत असा सवाल विराेधक करू लागले आहेत.

    खड्डयांवर मलमपट्टी

    पालिकेतील खासगी कंत्राटदारांमार्फत हे खड्डे भरले जात आहेत. मात्र खड्डे भरण्यासाठी तैनात केलेले कामगार प्रशिक्षित नाहीत. पालिकेकडे या कामासाठी अपूरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे खासगी कंत्राटदारांच्या कर्मचार्यांकडून खड्डे भरण्याची कामे करून घेतली जात आहेत. खड्डे भरण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असून डांबर, खडी यांचे मिश्रण तकलादू असल्याचे दिसून येत आहे. पावसाची जाेराची सर आल्यास किंवा वाहनांची वर्दळ वाढल्यास भरलेला खड्डा टिकत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे खड्डयांवर मलमपट्टी केली जात असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी वाढत आहेत.