‘लोकांना मास्कशिवाय फिरताना पहायचेय’; विनामास्क प्रेक्षकांना पाहून न्यायालयाने व्यक्त केल्या आशा

रविवारी इंग्लंडमध्ये (England) पार पडलेल्या विम्बल्डनच्या अंतिम लढतीत क्रिडा रसिकांच्या नजरा जोकोव्हिचच्या जेतेपदावर खिळल्या होत्या. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या (the Mumbai High Court bench) नजरा या विनामास्क प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या सेंटर कोर्टवर खिळल्या असल्याचे स्वतः न्यायमूर्तींनी सांगितले.

    मुंबई (Mumbai). रविवारी इंग्लंडमध्ये (England) पार पडलेल्या विम्बल्डनच्या अंतिम लढतीत क्रिडा रसिकांच्या नजरा जोकोव्हिचच्या जेतेपदावर खिळल्या होत्या. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या (the Mumbai High Court bench) नजरा या विनामास्क प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या सेंटर कोर्टवर खिळल्या असल्याचे स्वतः न्यायमूर्तींनी सांगितले. तसेच आपल्या भारतातही लोकांना असेच मुक्तपणे मास्कशिवाय फिरताना पहायचे असल्याची आशाही त्यांनी व्यक्त केली.

    राज्यातील कोविड-१९च्या सद्यस्थितीबाबत आणि येऊ घातलेल्या तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी राज्य सरकारच्या सज्जतेबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर मंगळवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. तेव्हा, विम्बल्डनची अतिम लढतीत सेंटर कोर्टवर उपस्थित एकाही प्रेक्षकाने मास्क घातले नव्हते, कोर्ट प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले होते.

    एका भारतीय क्रिकेटपटूनेही त्या सामन्याला हजेरी लावली होती. मात्र, त्यानेही मास्क घातले नव्हते ही बाब न्या. कुलकर्णी यांनी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या निदर्शनास आणून दिली आणि भारतात अशी वेळ कधी येणार? भारतीय पुन्हा कधी सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगू लागणार? अशी विचारणाही केली. त्यावर सगळ्यांचे लसीकरण ही एकमेव त्यामागची गुरुकिल्ली असल्याचे खंडपीठाने नमूद केले.

    दुसरीकडे, ईशान्येकडील दोन राज्यात कोरोनाची तिसरी लाट पसरल्याचे वृत्त आहे. त्याचा सामाना करण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्यातील कोरोनाबाबतची सद्यस्थिती ही दिलासादायक असली तरीही गाफील राहून चालणार नाही. काही कमी पडणार नाही यासाठी लक्ष देणेही आवश्यक असल्याचेही न्यायालये यावेळी नमूद केले. तसेच राज्यात कोरोना विषाणुच्या डेल्टा-प्लसचे रुग्ण सापडले असल्याचाही माहिती आहे. नागपूरात ११ रुग्ण सापडले असल्याचे वृत्तपत्रात म्हटले आहे.

    हा विषाणू घातक असून संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी राज्याकडून तातडीने उपाययोजनांबाबत कृती आखणे गरजेचे असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले आणि याचिकाकर्त्यांना यासंदर्भातील सुचना राज्य सरकारला सुचविण्याचे तसेच त्याबाबत राज्य सरकारला सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर कऱण्याचे निर्देश देत खंडपीठाने सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब केली.