विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा; पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातही धो धो बरसणार

महाराष्ट्रात आज प्रामुख्याने पूर्व विदर्भाला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, 28 ऑगस्टला वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

    मुंबई : प्रादेशिक हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी याबाबत ट्विट केले आहे.

    महाराष्ट्रात आज प्रामुख्याने पूर्व विदर्भाला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, 28 ऑगस्टला वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

    महाराष्ट्रात यादिवशी इतर जिल्ह्यातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. प्रादेशिक हवामान विभागाने राज्यात 29 आणि 30 ऑगस्टला राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊ शकतो.

    जून महिन्यात हवामान विभागाने यंदाचा मान्सून सामान्य असेल, असा अंदाज वर्तवला होता. जूनच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्यानंतर उघडीप दिली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातही बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती. पीक वाचवण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले होते. जुलैच्या दुसऱ्या पंधरावड्यात महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.

    गेल्या दहा पंधरा दिवसांपासून राज्यात पावसानं उघडीप दिली आहे. पाऊस उघडल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामे आवरली आहेत. पिकांना पावसाची आवश्यकता असून शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहे. राज्यातील अनेक धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे सध्या जर पाऊस झाला नाहीतर मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.