मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट?

२०१८ मध्ये पाणीसाठय़ात नऊ टक्के तूट राहिल्यामुळे वर्षभर १० टक्के कपात करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा पाणीसाठा कमी असल्यामुळं पाणी कपात करावी लागती की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

    मुंबईत गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा कमी असल्याने तलावक्षेत्राला पावसाची प्रतीक्षा आहे. मुंबईत २०१९ आणि २०२० साली पाऊस चांगला पडल्यामुळं तलावक्षेत्रात पाणीसाठा बऱ्यापैकी होता. परंतु यावर्षी जून आणि जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडला. पण या दोन महिन्यांच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पावसाची सरासरी खूपच कमी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं मुंबतील धरणक्षेत्रात पाणीसाठी कमी आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट येते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

    मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत ८६.८६ टक्के  पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तलावक्षेत्रात तुरळक पाऊस पडत असल्याने पाणीपातळी संथगतीने वाढत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात १७ जुलैपर्यंत अगदीच कमी पाऊस पडला होता. त्यामुळे पाणीकपात करावी लागते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे तलावांतील जलसाठय़ात मोठी वाढ झाली. मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणी पाणीसाठ्यात वाढ झाली मात्र, मागील महिन्याभरापासून तलाव क्षेत्रात तुरळक पाऊस पडत आहे. तसेच अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने रविवापर्यंत तलावांत १२ लाख ५७ हजार २५१ दशलक्ष लिटर म्हणजे ८६.८६ टक्के  पाणीसाठा जमा झाला.

    आता महिन्याभरात १४ टक्के  तूट भरून निघेल इतक्या पावसाची गरज आहे. तसेच गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा कमी आहे. २०२० मध्ये याच दिवशी ९२ टक्के  पाणासाठा होता तर २०१९ मध्ये ९५ टक्के  पाणीसाठा होता. त्यामुळे पाणी कपातीचे संकट टळले होते. वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात लावांतून मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करावा लागतो. सातही तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असतात, तेव्हा एकूण पाणीसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर असतो. मात्र ऑगस्टमध्ये कमी पाऊस पडल्याने वरील धरणात पाणीसाठा कमी आहे

    मागील वर्षी ऑगस्टमध्ये २० टक्के  पाणीकपात लागू करण्यात आली होती. परतू पुन्हा ऑगस्टमध्ये चांगला पाऊस झाल्याने, २१ ऑगस्टला पाणीकपात १० टक्के  करण्यात आली. २०१८ मध्ये पाणीसाठय़ात नऊ टक्के  तूट राहिल्यामुळे वर्षभर १० टक्के  कपात करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा पाणीसाठा कमी असल्यामुळं पाणी कपात करावी लागती की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.