आम्ही तुमची वाट बघतोय, नितेश राणेंचा शिवसैनिकांना इशारा; राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा होण्याची शक्यता

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मुंबईत राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा होण्याची दाट शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी तसे ट्विट केले आहे.

  मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मुंबईत राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा होण्याची दाट शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी तसे ट्विट केले आहे.

  नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

  माझ्या कानावर आलेल्या माहितीनुसार, युवासेनेचे कार्यकर्ते आमच्या जुहू निवासस्थानाबाहेर जमणार आहेत. त्यामुळे एकतर मुंबई पोलिसांनी शिवसैनिकांना रोखावे. अन्यथा पुढे काय घडले त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सिंहाच्या हद्दीत पाऊल ठेवायची हिंमत करु नका. आम्ही तुमची वाट बघतोय, अशा शब्दांत नितेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे आता मुंबईत शिवसैनिक आणि राणे समर्थक एकमेकांना भिडणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

  दरम्यान तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नारायण राणे यांच्याविरोधात महाड आणि नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महाड शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 153, 189, 504, 505(2) आणि 506 प्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहरचे पोलिस निरीक्षक शैलेश सणस याप्रकरणाचा पुढील तपास करतील. तर नाशिकमध्ये पोलिसांच्या सायबर सेलकडून राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  राणे नेमंक काय म्हणाले होते?

  राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.