कोणत्याही निर्णयावर आम्हाला आक्षेप नाही, पक्षाने घेतलेला निर्णय मान्य; नाराजीच्या चर्चाना पंकजा मुंडे यांच्याकडून पूर्णविराम

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज असल्याच्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, भाजपमध्ये वरिष्ठ चर्चा करुन निर्णय घेतात.  त्यामुळे कोणत्याही निर्णयावर आम्हाला आक्षेप नाही. पक्षाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. 

  मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विस्तार केला असून ४३ जणांनी राष्ट्रपती भवनात बुधवारी शपथ घेतली. ३६ नवे चेहरे मोदीच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत तर दुसरीकडे चार महत्वाच्या पदावरील मंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्रातून चार नेत्यांना मंत्रीपद दिल्यामुळे सर्वांचे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे प्रितम मुंडे यांना डावलल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी शपथविधी पार पडल्यानंतर अभिनंदनाचं ट्वीटदेखील केले नसल्यामुळे या चर्चेला उधाण आलं, दरम्यान यावर भाजपचे नेते काय म्हणाले आणि पंकजा मुंडे यांनी काय प्रतिक्रीया दिली पाहुयात

  फडणवीस काय म्हणाले

  तर नाशिक महापालिकेच्या बस सेवेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी फडणवीस आज शहरात आले असता पत्रकारांनी नेमका त्यांना हाच प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी प्रतिप्रश्न केला. ‘मुंडे भगिनी नाराज आहेत असं कोण म्हणतं? त्या नाराज नाहीत. उगाच त्यांना बदनाम करू नका. पक्षातील निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेतले जातात. योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात,’ असं ते म्हणाले. ‘नारायण राणे यांना मंत्री बनवताना त्यांच्या कार्यक्षमतेचा विचार केला गेला आहे. दुसरा कुठलाही विचार करण्यात आलेला नाही,’ असंही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

  दरेकर काय म्हणाले होते

  केंद्रातील किंवा राज्यातील कोणत्याही मंत्र्याचे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी अभिनंदन केले नसून त्या नाराज असल्याची चर्चा असल्याचे प्रवीण दरेकर यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले की, अभिनंदन केले नाही किंवा ट्विट केले नाही, असं सांगताना त्यांनी कुठे नाराजीदेखील व्यक्त केलेली नाही, याकडेही लक्ष द्यावे लागेल.

  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराज असल्याच्या चर्चाना पूर्णविराम दिला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, भाजपमध्ये वरिष्ठ चर्चा करुन निर्णय घेतात.  त्यामुळे कोणत्याही निर्णयावर आम्हाला आक्षेप नाही. पक्षाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.  यावेळी त्यांनी पत्रकरांच्या प्रश्नाना उत्तरे दिली.

  तसेचं त्या म्हणाल्या की मी इतकी मोठी नेता नाही की भाजपला मला संपवायचे आहे असे मला वाटत नाही. पंकजा मुंडे म्हणाल्या की भाजपमध्ये राष्ट्रप्रथम, द्वितीय पक्ष आणि तृतीय मी असे तत्व आहे. आमच्या संस्कृतीला मी पणा मान्य नाही. आपण, आम्ही असेच आम्ही म्हणतो  तेच आम्हाला मान्य आहे. त्यामुळे टिम नरेंद्र , टिम देवेंद्र अशी कुठली टीम पक्षाला मान्य आहे असे मला तरी वाटत नाही.

  मनात नाराजी नाही

  प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चांवरही प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या की, आम्हाला मंत्रिपद मिळाले नाही. म्हणून नाराज होण्याचे कारण नाही. माझ्या घरात कोणताही पूर आला नाही. माझे घर वाहून गेले नाही किंवा मी कुठेही आश्रित होण्याचा अर्ज करत नाही. मग माझे पुनर्वसन कोणी कशाला करेल? असा सवाल करतानाच जे बरबाद झालेत. जे वाहून गेलेत. जे खत्म झाले आहेत. त्यांचे पुनर्वसन केले जाते. माझ्या मनात कोणतीही आपत्ती नाही. हा पक्षाचा निर्णय आहे. अशा निर्णयातून मी गेली आहे. मात्र, कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल असते. नाराजी असते. हे नाकारता येत नाही. पण माझ्या आणि कुटुंबाच्या मनात नाराजी नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

   आता चर्चांना विराम दिला पाहिजे

  त्या म्हणाल्या की, भाजपमध्ये निर्णयाची एक पद्धत आहे. त्यानुसार घेतले जातात. सर्वच राज्यांच्या बाबतीत असे निर्णय घेतले आहेत. केवळ प्रीतम नाही तर हिना गावित यांचे नावही चर्चेत होते. पण नवीन लोकांना संधी देण्यात आली. त्यावर हरकत नाही. त्यांच्यात नेतृत्व क्षमता आहे. म्हणूनच त्यांना मंत्रिपद देण्यात आले पण आता या चर्चांना विराम दिला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

  दरम्यान पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर गोपीनाथगडावर मेळावा घेऊन प्रदेश नेतृत्वाविरुध्द अप्रत्यक्ष बंडच पुकारले होते. परिणामी विधानपरिषदेवर संधी मिळावी यासाठी प्रयत्न करुनही त्यांच्याऐवजी लातूरचे वंजारी समाजातील रमेश कराड यांना आमदार केले. तर भागवत कराड यांनाही पक्षाने थेट राज्यसभेवर घेऊन पक्षात मुंडे भगिनींच्या शिफारशीशिवायही निर्णय होऊ शकतात हा संदेश दिला होता. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी भाजपबरोबर जोडलेला वंजारी व इतर ओबीसी समाज पक्षाबरोबर रहावा यासाठी भाजप नेतृत्वाने डॉ.कराड यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात घेऊन सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ.कराड हे बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या चिखली या गावचे असून ते औरंगाबादचे स्थायिक आहेत. दिवंगत मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे मुंडे भगिनी समर्थकांना काय व्यक्त व्हावे असा प्रश्न पडला आहे.