आम्ही राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात तरंगताना पाहिलाय; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

आपण राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात वाहताना आणि तरंगताना पाहिला. यामुळे भारताचा भेसूर चेहरा जगासमोर आला. तरीही भाजपकडून कोरोना असो किंवा चक्रीवादळ प्रत्येक संकटाचे राजकारण सुरुच आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  मुंबई : गंगेत तरंगणाऱ्या प्रेतांना ऑक्सिजन किंवा लस मिळाली नाही. भाजपचे नेते म्हणतात त्याप्रमाणे कोरोना बरे करणारे गोमूत्र तरी त्यांना मिळायला हवे होते, अशी जळजळीत टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली.

  आपण राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात वाहताना आणि तरंगताना पाहिला. यामुळे भारताचा भेसूर चेहरा जगासमोर आला. तरीही भाजपकडून कोरोना असो किंवा चक्रीवादळ प्रत्येक संकटाचे राजकारण सुरुच आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली. दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील ‘रोखठोक’ या सदरातून संजय राऊत यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे.

  भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर या गोमूत्रामुळे कोरोनाची बाधा होत नाही, असे सांगतात. जगातील अनेक देशांमधील वृत्तपत्रांनी गोमुत्रावरून आपली चेष्टा केली आहे. गंगेत हजारो कोरोनाग्रस्तांचे मृतदेह सोडून दिले व त्यांच्यावर धड अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. त्यांच्यापर्यंत हा गोमूत्र संदेश गेला असता तर त्यांना गंगेत फेकून देण्याची वेळ आली नसती, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  आमच्या मुलांची लस तुम्ही परदेशात का पाठवली?

  मोदीजी आमच्या मुलांची लस तुम्ही परदेशात का पाठवली?, हा प्रश्न चुकीचा ठरत नाही. देशात लसीचा तुटवडा आहे, लसीकरण थांबले आहे. 12 एप्रिलला केंद्र सरकारने लस उत्सव साजरा केला. पण लसीच ठणठणाट होता. गेल्या 30 दिवसांमध्ये लसीकरणात 80 टक्के घसरण झाली आहे. पंतप्रधान मोदी लस तयार करणाऱ्या फॅक्टऱ्यांमध्ये जाऊन आले. त्याने काय साध्य झाले, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

  तसेचं संपूर्ण जग कोरोनाशी लढण्याची रणनीती ठरवण्यात गुंतले असताना आमच्या देशाचे नेतृत्व निवडणूक जिंकण्याची रणनीती आखताना दिसत होते. अमेरिका मासमुक्त झाला. इस्रायल कोरोनामुक्त झाला. युरोपातील अनेक राष्ट्रे सावरली. चीनने कोरोनावर विजय मिळवला व मोठी आर्थिक झेप घेतली. मात्र, आम्ही कोरोना काळात निवडणुका आणि सीबीआय, ईडीचा खेळ करत बसलो, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.